Message to party worker, Take responsibility of food, water, medicine, safety : मनसैनिकांना संद अन्न-पाणी, औषधोपचार, सुरक्षिततेची जबाबदारी घ्या
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांना खाणं-पिणं आणि सोयी-सुविधांचा मोठा तुटवडा भासत असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, “मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, पण आंदोलनासाठी आलेले हजारो बांधव आपलेच आहेत. ते शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट भरणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. आपल्या घरापासून, शेतापासून दूर राहून ते आंदोलन करत आहेत. त्यांना काहीही कमी पडू नये, ही जबाबदारी आपली आहे.”
Manoj Jarange : आजपासून पाणी त्याग; कडक उपोषणावर जरांगे ठाम !
त्यांनी पुढे स्पष्ट आवाहन करत सांगितलं, जेव्हा गरज पडेल तेव्हा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. मुंबईत एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो एकटा आहे.
अमित ठाकरे म्हणाले, “ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली तरी ती आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणून आपण जर त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. मला खात्री आहे की प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील.”
Maratha movement : कायद्याच्या चौकटीतच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार !
दरम्यान, आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या हजारो आंदोलकांसाठी अन्न-पाणी, निवारा आणि आरोग्याच्या सोयींचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण कठोर करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत चालली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी नुकतीच राज ठाकरेंच्या विरोधात टीका केली होती त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचं आवाहन हे राजकीय चर्चेचा विषय झाला आहे.
___








