Congress changes office-bearers, appoints new in-charge : बडनेरा,अमरावतीसह सर्व मतदारसंघांसाठी जबाबदारीचे वाटप
Amravati जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुढील राजकीय घडामोडींचा विचार करून प्रदेश काँग्रेसने अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी नवीन प्रभारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी, कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी व निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार करण्यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बडनेरा व अमरावती शहर या महत्त्वाच्या मतदारसंघांची धुरा डॉ. झिशान हुसेन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रश्न, संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीतील रणनीती आखण्याचे काम ते पाहणार आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी अक्षय राऊत यांना जबाबदारी देण्यात आली असून, तेथील युवकांना सक्रिय करून संघटन मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.
तिवसा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून धनंजय देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि महिला वर्गाशी संपर्क वाढविण्याचे काम त्यांच्याकडे असेल. दर्यापूर मतदारसंघासाठी प्रशांत पाचाडे यांना प्रभारीपद मिळाले आहे. शेतकरी समस्यांवर चर्चा, स्थानिक प्रश्नांवर आंदोलने व पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी यावर ते लक्ष केंद्रित करणार आहेत.
Tension in Nepal : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी; रस्त्यावर उतरले तरुण !
मेळघाट मतदारसंघात संजीवनी बिहाडे या महिला नेत्या प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि युवक-विद्यार्थी वर्गाला जोडणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतील. अचलपूर मतदारसंघासाठी संजय खाडे यांची निवड करण्यात आली आहे. या भागात काँग्रेसची जुनी परंपरा पुन्हा बळकट करण्याचे ध्येय त्यांच्यासमोर ठेवले गेले आहे.
तर वरुड-मोर्शी मतदारसंघासाठी जावेद अन्सारी यांना प्रभारीपद देण्यात आले आहे. शेतकरी व कामगारांच्या समस्या, तसेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे वाढविणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
या सर्व नियुक्त्यांमुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसने संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रभारी नियुक्त करून कार्यकर्त्यांपर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अधिक सक्षमपणे उभी राहण्यासाठी ही प्रभारींची टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसने व्यक्त केला आहे.








