Uddhav Thackeray discusses Matoshree with Congress leaders : मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा
Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज काँग्रेस नेत्यांची भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद यासह महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत संभाव्य युतीबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत राहणार का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. काँग्रेस नेत्यांनी या विषयावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून अंतिम भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत आता नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या महाविकास आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहेत.
Tension in Nepal : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी; रस्त्यावर उतरले तरुण !
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने औपचारिक दावा केला आहे. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाला असून, काँग्रेसकडे आठ आमदार तर शिवसेना ठाकरे गटाकडे सहा आमदार आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसची मागणी जोर धरताना दिसते आहे. या पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे.
मनसेसोबत युतीबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडकडे राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत महापालिका निवडणुकांसाठी हातमिळवणीचे संकेत दिल्यानंतर, काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.
___








