Citizens protest out of frustration over frequent power cuts : लोणारमध्ये ठिय्या आंदोलन, उपकेंद्रावर धडकून व्यक्त केला संताप
Lonar शहरातील धार रोडसह विविध भागात सुरू असलेल्या असमान लोडशेडींगविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत ९ सप्टेंबर रोजी रात्री विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रावर धडक दिली. अचानक काही भागातच वीज बंद ठेवली जात असताना इतर भागात पुरवठा सुरळीत असल्याने संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेराव घालत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या लोडशेडींगमुळे व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. “लोडशेडींग करायची तर संपूर्ण शहरात समानपणे करा, अन्यथा बंद करा,” अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यायकारक लोडशेडींगविरोधात नागरिकांनी “एमईसीबी मुर्दाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, वाढत्या विजचोरीवर नियंत्रण आणण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने अलीकडेच धडक मोहीम राबवत लाखो रुपयांचा दंड वसूल केला. तरीदेखील काही भागातच लोडशेडींग करून निष्पाप नागरिकांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. या अन्यायाविरोधात संतप्त नागरिकांनी एक तास संपूर्ण शहराचा वीजपुरवठा बंद करून उपकेंद्रासमोर ठिय्या मांडला.
Nitin Gadkari : अमरावतीकरांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी गडकरींचा सेतूबंध!
परिस्थिती काही काळ गोंधळाची झाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर वरिष्ठ अधिकारीही तातडीने उपस्थित झाले. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, अन्यायकारक पद्धतीने लोडशेडींग सुरूच राहिल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनामुळे विजेच्या प्रश्नावर लोणारमध्ये प्रशासनाविरोधातील असंतोष उफाळून आला असून, राज्य शासन व वीज वितरण कंपनीवर जनतेचा रोष तीव्र होत आहे.








