Sand mafia keeping watch on the revenue team using drones : महसूल पथकांच्या हालचालीकडे लक्ष, पालकमंत्र्यांचा कारवाईचा इशारा
Buldhana जिल्ह्यात रेतीमाफियांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नाही. महसूल आणि पोलिसांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तस्करांकडून आता थेट ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ही बाब थेट पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांना तातडीने संपर्क साधत तस्करांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले.
जिल्ह्यातील रेतीमाफियांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. महसूल व पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या, मार्गांवर लोखंडी गेट उभारून तस्करी रोखण्याचे प्रयत्न झाले. तरीदेखील तस्करांनी आता शक्कल लढवत महसूल अधिकाऱ्यांवर ड्रोनद्वारे पाळत ठेवणे सुरू केले आहे.
हा प्रकार प्रशासनाच्या कामकाजात थेट अडथळा आणणारा आणि कायद्याला आव्हान देणारा असल्याने पालकमंत्री जाधव यांनी “गौण खनिज व रेतीमाफियांकडून ड्रोनचा वापर रोखा आणि कठोर कारवाई करा” असे आदेश दिले.
दरम्यान, खडकपूर्णा धरण व नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर गदा येताच तस्करांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी उचललेला मुद्दा आता जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
Maratha Reservation : आता बंजारा समाज रस्त्यावर, एस.टी. आरक्षणाची मागणी
आता महसूल व पोलीस प्रशासन ड्रोनचा वापर करून कारवाई करणाऱ्या रेतीमाफियांना कशाप्रकारे धडा शिकवते, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.








