Encounter specialist Pradeep Sharmas revelation : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा गौप्यस्फोट
Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
शर्मा म्हणाले, “2003 साली मुलुंड येथे ट्रेन ब्लास्ट झाला होता. त्यामध्ये 3 वॉन्टेड दहशतवादी होते. यातील 2 पाकिस्तानी तर 1 काश्मिरी होता. त्यांचा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्लॅन होता. यासाठी ते गोरेगाव हायवेवरील महानंदा डेअरीजवळ येणार असल्याची माहिती आमच्याकडे होती. त्यांच्याकडे एके-56, एके-47 आणि ग्रेनेडसारखी शस्त्रं होती. आम्ही त्यावेळी कारवाई करून त्यांना रोखलं.”
ते पुढे म्हणाले, “त्या ऑपरेशनदरम्यान माझ्या बुलेटप्रूफ जॅकेटवर एके-47 च्या दोन गोळ्या लागल्या होत्या. आम्ही योग्य वेळी कारवाई केल्यामुळे त्यांचा हल्ल्याचा कट फसला. त्यावेळी मला उद्धव ठाकरे यांनी चहा प्यायला बोलावलं होतं, अशीही आठवण आहे.”
Vanchit Bahujan Aghadi : पाणी हा मूलभूत अधिकार, महापालिका नळ तोडू शकत नाही!
याशिवाय राज ठाकरे यांच्यावरही मोठा धोका असल्याचं प्रदीप शर्मा यांनी सांगितलं. ते म्हणाले, “त्या काळात आमच्या इंटरसेप्टमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल चर्चा ऐकू आली होती. त्यांना कोकण दौऱ्यादरम्यान मारण्याचा कट रचला गेला होता. आम्ही ही माहिती जॉईंट सीपी क्राईम मीरा बोरवणकर मॅडम यांना दिली. त्यांनी कमिश्नरना सांगितलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांना कोकण दौरा टाळण्याचा सल्ला देण्यात आला.”
या खुलाशामुळे त्या काळातील गुप्त कारवाया आणि राजकीय नेत्यांवरील दहशतवादी धोक्यांचा गंभीर मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
_____








