व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली; संगीता शिंदे यांच्या पोस्टची चर्चा

शिक्षकांनी माझी किंमत दाखवून दिली; संगीता शिंदे यांच्या पोस्टची चर्चा

भाजपने नाकारली होती उमेदवारी, सोशल मीडियावर व्यक्त केली खदखद

Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजयाचा गुलाल उधळला. मंगळवारी झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीच्या मतांवरूनच सरनाईक यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते. त्यामुळे बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनाही पराभवाची जाणीव होऊ लागली होती.

याचदरम्यान, भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या संगीता शिंदे यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

संगीता शिंदे यांनी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली होती. शिक्षकांचा आपल्याला भक्कम पाठिंबा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तसेच, आपले खासदार बंधूही आपल्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी? जयश्री गुट्टे यांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण !

मात्र, प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्या सहाव्या क्रमांकावर राहिल्या. पहिल्या पसंतीच्या मतांमधूनच आपला पराभव निश्चित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, ‘आदरणीय गुरुजन, धन्यवाद… आज खूप आनंद झाला. मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे, हे दाखवून दिले.’

शिक्षक मतदारांनी दिलेल्या कौलानंतर संगीता शिंदे यांनी केलेल्या या पोस्टमधील शब्दांचे विविध अर्थ लावले जात आहेत. निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसताना त्यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. खासदारांच्या भगिनी असलेल्या संगीता शिंदे यांच्या या पोस्टमागील नेमकी भावना काय, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 

error: Content is protected !!