Gunaratna Sadavartes attack on Raj Thackeray : गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!
Mumbai: आज पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, आता त्यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
सदावर्ते म्हणाले, “निवडणुकांना समोर जाण्याच्या आधीच हे लोक बोलत आहेत, म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याच्या आधीच पैलवान चितपट होणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचे साथीदार पक्ष आधीच पराभवाची भीती बाळगून आहेत. या आधी राज ठाकरेंचं ‘टन टन टोल’ झालं, भोंगे झाले, आता फक्त तोंडाची हवा घालत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
Raj Thackeray : राज ठाकरे यांचा आरोप : महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार
राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यात निवडणूक आयोगावर टीका करत मतदार याद्यांतील घोळ संपेपर्यंत निवडणुका घेऊन दाखवा, असा इशारा दिला होता. या विधानावर प्रत्युत्तर देताना सदावर्ते म्हणाले, “आज विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. पण प्रत्यक्षात आपल्या सरकारनेच सर्वात योग्य काम केले आहे शेतकऱ्यांना मदत, विकास प्रकल्प, आणि प्रशासनिक सुधारणा केल्या आहेत. हे विरोधक फक्त रडीचा डाव खेळत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आधी सांगावं तेलंगणात आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तेव्हा तिथे निवडणूक आयोग कुणाच्या ताब्यात होता? मग महाराष्ट्रातच का आयोगावर आरोप केले जात आहेत?”
Local Body Elections : सावनेरमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला !
सदावर्ते यांनी मनसेच्या भूमिकेवरही प्रहार केला. “राज ठाकरे यांच्याकडे आज काय आहे? ते अजित पवारांवर बोलले, पण त्यावरही लोकांनी टाळ्या दिल्या नाहीत. त्यांची पार्टी राजकारणात दिशाहीन झाली आहे. शिवाय त्यांचा पक्ष प्रांतवादी आहे. आम्ही लवकरच त्यांच्या या विधानांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत,” असं सदावर्तेंनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर आता सदावर्तेंच्या या तीव्र प्रतिक्रियेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून ठाकरे विरुद्ध सदावर्ते अशी नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.
_____








