व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ramraksha recitation: राम मंदिरातील कथित ‘दान लुटी’वरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात; आम्हाला...

Ramraksha recitation: राम मंदिरातील कथित ‘दान लुटी’वरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात; आम्हाला रामरक्षा म्हणता येत नसेल, पण आम्ही ‘रामरक्षण’ करणारे

Uddhav Thackeray attacks devendra Fadnavis in Nagpur: ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण आणि महाआरती

Nagpur रामरक्षा पठण करणे हे केवळ देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. आम्हाला कदाचित रामरक्षा तोंडपाठ म्हणता येत नसेल, मात्र आम्ही खऱ्या अर्थाने ‘रामरक्षण’ करणारे आहोत, अशा कडक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना नागपुरात ठणकावले.

श्रीराम मंदिरातील कथित दान लुटीच्या विरोधात आज शनिवारी नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने रामरक्षा पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर आंदोलनात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर आणि भ्रष्टाचारावर जोरदार तोफ डागली. याप्रसंगी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, काँग्रेस नेते सुनील केदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, शिवसेना संपर्कप्रमुख सतीश हरडे आणि जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया आदी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Sanjay Raut: रामरक्षा पठणावरून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; सोनम वांगचुक यांना रात्रीतून उचलले, संजय राऊत यांचा दावा

आपल्या भाषणाची सुरुवातच फडणवीसांच्या आरोपांचा समाचार घेत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व भाजपसारखे ढोंगी नाही. ‘मनी नाही भाव अन् म्हणे देवा मला पाव’ अशी भाजपची अवस्था झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी राममंदिरासाठी खरा लढा उभा केला होता आणि बाबरी पडली तेव्हा ते अभिमानाने उभे राहिले होते, पण आज हे कसले हिंदुत्व सुरू आहे? ज्या विदर्भाने भाजपला भरघोस मतांनी निवडून दिले, तिथेच आज पेपरफुटी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. सरसंघचालक म्हणतात हिंदूंनी दोनपेक्षा जास्त अपत्ये जन्माला घालावीत, पण ती जन्माला घालून त्यांच्या हाती पेपरफुटी आणि आत्महत्याच येणार का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

आज देशात हिंदू बहुसंख्य आहेत, पण आता या ढोंगी हिंदूंपासूनच देशाला वाचवण्याची वेळ आली असून, आधी पक्ष फोडले, सरकारे पाडली आणि आता थेट देवाच्या मंदिराच्या तिजोऱ्या फोडल्या जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, केदारनाथ असो की उज्जैन, सर्वच मंदिरांमध्ये चोऱ्या होत असून साधू-संत संताप व्यक्त करत आहेत. ही चोरी फक्त मंदिरांवर नाही, तर तमाम हिंदूंच्या मनावर घातलेला दरोडा आहे.

Ramraksha recitation: रामरक्षा पठणावरून नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा; संदीप जोशींनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ केला व्हायरल

फडणवीसांना थेट आव्हान देत त्यांनी स्पष्ट केले की, तुम्हाला रामरक्षा वाचता येते म्हणून तुम्ही तुमच्या पापांतून सुटू शकत नाही. जर तुमच्यात हिंमत असेल आणि प्रामाणिकपणे चौकशी करायची असेल, तर ‘SIT’ नावाचे ढोंग उभे करून सत्य लपवू नका; थेट निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करा. आमच्या कानाकणात खरे हिंदुत्व भरले असून तुमच्यासारखी नाटक कंपनी आम्ही करत नाही.

आजपासून विदर्भातून सुरु झालेले ‘रामरक्षा आंदोलन’ अधिक तीव्र करण्याची घोषणा करत ठाकरेंनी विदर्भातील जनतेला आवाहन केले की, ज्या भाजपला तुम्ही डोक्यावर घेतले, त्यांनीच तुमचे वाटोळे केले आहे, त्यामुळे आता यापुढे भाजपला एकही मत न देण्याचा ठाम संकल्प करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

error: Content is protected !!