Opposition slams for withdrawing hunger strike : उपोषण मागे घेतल्याने विरोधकांकडून टीकेची झोड
Chhatrapati SambhajiNagar : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला अजब वळण मिळाले आहे. गेल्या दहा दिवसांपासून उपोषणावर बसलेला एक शेतकरी अचानक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि तेथेच उपोषण मागे घेतल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी संजय शिरसाट यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे.
कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ठोस मदत द्यावी, या मागणीसाठी 10 ऑक्टोबरपासून संबंधित व्यक्तीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा नववा दिवस सुरू असताना अचानक तो शेतकरी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी पोहोचला आणि त्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर, “मंत्र्यांनी उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट का घेतली नाही?” असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
Atul Save : नाशिकमध्येही होणार महाज्योतीचे प्रशिक्षण केंद्र !
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “असे समजण्याचे काही कारण नाही. मी त्या दिवशी सायंकाळी मुंबईहून परत आलो. उपोषणकर्त्याचे वडील आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आग्रह केला की उपोषण माझ्या हातून सोडायचे आहे. तहसीलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह ते माझ्याकडे आले. आम्ही एक तास चर्चा केली आणि शांततेत त्यांनी उपोषण सोडले. एखाद्या शेतकऱ्याने भेटायची इच्छा व्यक्त केली तर मी त्याला नाही कसे म्हणणार?”
त्यांना विचारले असता की त्यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट का दिली नाही, यावर शिरसाट म्हणाले, “त्या शेतकऱ्याची तब्येत ठीक नव्हती. त्यांना चक्कर येत होत्या. त्यामुळे त्यांना इकडे आणून काळजी घेणे गरजेचे होते. माझा जाण्याचा आणि त्यांचा येण्याचा वेळ समांतर होता. त्यामुळे त्यांना बोलावून घेतले यात गैर काही नाही.”
Namaz at Shaniwarwada : शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल !
शिरसाट यांच्यावर असा आरोप झाला होता की त्यांच्या पीएने उपोषणकर्त्यांना सांगितले की, “साहेबांना वेळ नाही, त्यामुळे तुम्हीच इकडे या.” या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, “असे काहीही घडलेले नाही. मी आल्यानंतर सगळ्यांशी तासभर चर्चा केली. यात कुठलाही वाद किंवा गैरसमज नाही.”
त्यांच्या या कृतीला विरोधकांकडून “असंवेदनशील” म्हणत टीका केली गेली असली तरी संजय शिरसाट यांनी ती फेटाळून लावली. “मला यात काही असंवेदनशील वाटत नाही, आणि जे घडलंच नाही त्यात संवेदनशीलतेचा प्रश्नच येत नाही. विरोधकांना टीका करू द्या. शेतकऱ्यांसाठी काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Mahadevrao Shivankar : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मंत्री शिरसाट यांच्या भूमिकेवर चर्चेचा उहापोह सुरू झाला आहे. उपोषणकर्त्याला थेट मंत्र्यांच्या घरी बोलावून घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, तर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप ठोस निर्णयाची प्रतीक्षा सुरूच आहे.
______








