Local body election : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका पुढे ढकलण अशक्य !

Chief Minister Fadnavis’ big hint targeting Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

Mumbai : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि डावे पक्ष यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “निवडणुका आता होणारच; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्या पुढे ढकलणे अशक्य आहे.”

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्यावर केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार याद्यांमधील दुबार आणि तिबार नावांवर आक्षेप घेत निवडणुका थांबविण्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर विरोधकांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही.

Eknath Shinde : “एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री”

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर कडाडून टीका करत, “मतदार याद्या स्वच्छ न करता निवडणुका घेऊ नका,” अशी मागणी केली होती. मात्र या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले, “निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही निवडणुकांना सामोरं जाण्यास तयार आहोत. तिन्ही पक्ष आपआपल्या स्तरावर युतीबाबत निर्णय घेतील, पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत. कुठं युती झाली नाही, तरी आमची ‘पोस्ट युती’ होईल. महाराष्ट्राची जनता या निवडणुकीत महायुतीलाच कौल देईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, “दगाबाजरे” अशी सरकारविरोधी मोहिम त्यांनी सुरू केली आहे. ठाकरे यांनी सरकारवर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न दिल्याचा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडले, याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये बक्षीस घ्या.”

विरोधकांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणे शक्य नाही. आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ आणि महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर !

या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे की राज्य सरकार निवडणुका वेळेवर घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे विरोधक मतदार याद्यांतील घोळाचा मुद्दा जोरदारपणे रंगवत आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी चुरशीचे होणार, हे निश्चित आहे अशी चर्चा रंगत आहे.