Vanchit Bahujan Aghadi : ट्रोलर्सना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Warning of Intense Protest if Trolls Are Not Arrested : वंचित बहुजन युवा आघाडीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Akola वंचित बहुजन युवा आघाडी, जिल्हा आणि महानगर शाखेच्या वतीने सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणाऱ्या ट्रोलर्सना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनुसार संबंधित ट्रोलर्सविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असूनही पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला. या निष्क्रीयतेचा निषेध नोंदवत शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. जवळपास पाच तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील तिन्ही रस्त्यांवर वाहतूक बंद करावी लागली.

Local Body Elections : पाच नगराध्यक्षपदांसाठी चुरशीची लढत!

यावेळी युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, ट्रोलर्सविरुद्ध तातडीने कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना शांततेत निवडणुका पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या फलकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह त्यांच्या विचारांचे संदेश झळकत होते. त्यात “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे विषारी झाड आहे” असा मजकूरही होता.

या आंदोलनात प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, महासचिव मिलिंद इंगळे, मनोरंजन बनसोड, कलीम खान पठाण, गजानन गवई, वंदना वासनिक, सचिन शिराळे, जय तायडे, नागेश उमाळे, अशिष रायबोले, जिया शहा, अक्षय राऊत, सम्राट तायडे, संगीत अढाऊ, अनघा ठाकरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व घटक संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.