Mahayuti in Nagpur : उपराजधानीत शिंदेसेना–राष्ट्रवादीची स्वतंत्र तयारी !

Ajit Pawar himself signaled the separate preparations of Shinde Sena-NCP in the vice-capital Nagpur : अजित पवारांनीच दिले संकेत, भाजपला वगळून सुरू नव्या युतीच्या चर्चा, महायुती धोक्यात ?

Nagpur : उपराजधानी नागपुरात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपला वगळून या दोन पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

शिंदे सेनेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या या बैठकीला दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवरकर, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश इटकेलवार, विनोद सातंगे, चंद्रहास राऊत आणि अमित कातुरे सहभागी झाले होते.

Pune land scam : ‘गेम’ करायचा असेल तर होते सुपरफास्ट कारवाई

या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत महायुतीच्या स्थानिक स्तरावरील संवादावर स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी “दोन्ही निवडणुका तुम्हालाच लढवायच्या आहेत” असा थेट संकेत दिल्याची माहिती बैठकीनंतर सूत्रांनी दिली. त्यानंतर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आगामी स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र रणनीती आखत असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर, महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट दिसत आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते सांगतात, ‘आम्हाला महायुती तोडायची नाही, पण जर भाजपकडून प्रतिसाद मिळत नसेल, तर आमची स्वतंत्र तयारी अपरिहार्य आहे.’ महायुतीचा स्थानिक स्तरावरील एकत्रित कार्यक्रम ठप्प पडल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र येऊन निवडणूक नियोजन सुरू करत असल्याचेही सूत्र सांगतात.

Pune land scam : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार नाही

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपकडून चालू असलेल्या ‘प्रमुख भागीदार’ भूमिकेवरील असंतोष हाच या हालचालींचा केंद्रबिंदू आहे. जर संवाद आणि समन्वय साधला गेला नाही, तर नागपूरसह विदर्भात महायुतीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपराजधानीतल्या या बैठकीनंतर आता राज्यातील महायुतीच्या भविष्याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत, आणि सर्वांचे लक्ष पुढील महायुतीतील या दोन पक्षांच्या पुढील बैठकीकडे लागले आहे.