Congress corporator’s husband stabbed to death in Akola : दुचाकीची धडक, त्यानंतर सपासप वार; एका संशयिताला घेतले ताब्यात
Akola शहरातील स्टेशन रोड परिसरात मंगळवारी भरदिवसा काँग्रेस नगरसेविकेच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या याकूब खान पहेलवान यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
मृत याकूब खान पहेलवान हे प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेस नगरसेविका रफिया बी. याकूब खान यांचे पती होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकूब खान पहेलवान हे रेल्वे स्थानक परिसरात चहा घेतल्यानंतर स्टेशन रोडमार्गे जुन्या शहरातील नवाबपुरा येथील त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी रामदासपेठ पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर समोरून भरधाव आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर संबंधित हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
जखमी याकूब खान पहेलवान यांना प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य, नियोजित कट किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा रामदासपेठ पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत असून, हल्लेखोराचा नेमका हेतू उघड करण्यासाठी विविध अंगांनी तपास केला जात आहे.








