Secret meeting at Sanjay Shirsat’s residence : संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी सिक्रेट मीटिंग
Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतही अंतर्गत तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि लवकरच जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांतील भूमिका पुढील मोठ्या निवडणुकांवर थेट परिणाम करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पालघरमध्ये शिंदे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला असून डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे सेना, राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार गट आणि इतर पक्ष एकत्र आले आहेत. सिंधुदुर्गच्या धर्तीवर हा प्रयोग करण्यात आला आहे. नंदुरबारमध्येही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या बैठकीत ही रणनीती ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे भाजपला बाजूला ठेवून शिंदे गटाचे स्वतंत्र राजकीय समीकरण उभे राहण्याची चिन्हे आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही महत्त्वाची हालचाल झाली. मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा एक गुप्त बैठक पार पडली. ही बैठक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती. शिंदे गटातील प्रमुख आमदार आणि खासदारांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
शिवसेना भाजपासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अधिकृत युतीचा प्रस्ताव ठेवणार आहे. मात्र भाजपने हा प्रस्ताव नाकारल्यास शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीला मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Local Body Elections : वंचित बहुजन आघाडीची जिल्हानिहाय वेगळी भूमिका
आगामी निवडणुकांमध्ये शिंदे सेनेची स्वतंत्र भूमिका महायुतीतील समीकरणाचे भविष्य ठरवणार आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांमध्ये काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








