Anil Deshmukh : सत्तेसाठी नैतिकता गहाण ठेवणाऱ्यांना पवार साहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही !

NCP leader criticizes Water Resources Minister Vikhe Patil : मंत्री विखे पाटलांवर अनिल देशमुख यांची टीका

Nagpur: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुती यांच्यातील राजकीय तापमान पुन्हा चढले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. सत्तेसाठी नैतिकता, तत्व आणि निष्ठा गहाण ठेवून केवळ दिल्लीच्या शहांची चाकरी करणाऱ्या विखे पाटलांची पवार साहेबांवर बोलण्याची पात्रता नाही, अशा शब्दांत देशमुखांनी जोरदार पलटवार केला.

देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अस्तित्वाबद्दल विखे पाटलांनी केलेली टीका ही केवळ राजकीय ईर्षेची प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताकदीबाबत कोणतीही शंका असू नये. एका सामान्य कार्यकर्त्यानेही या पक्षाची क्षमता लोकसभेत सिद्ध करून दाखवली आहे, असे ते म्हणाले. त्यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीचा उल्लेख करत, लंके यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांना चांगलाच धक्का दिला. जनतेसमोर काय आहे ते दाखवून दिले, असे ठामपणे सांगितले.

Local Body Elections : चिखली निवडणुकीत ‘संपूर्ण सस्पेन्स’, बंडखोरी अटळ, राजकीय वातावरण तापलं

देशमुखांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि महायुतीतल्या जुने-नवे नेते यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि नगर जिल्ह्यात विशेषतः राष्ट्रवादी गटांमध्ये राजकीय समीकरणे अधिक नाजूक झालेली दिसत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही गटांकडून जोरदार टीका-प्रत्याक्रम सुरू आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याच्या राजकारणातील जुने आणि प्रभावी नेते मानले जातात. परंतु त्यांच्यावर पक्षांतर, सत्तेची लालसा अशा आरोपांचा उल्लेख विरोधकांकडून सातत्याने केला जातो. देशमुखांनीही त्याच मुद्द्याला हात घालत, दिल्ली नेतृत्वाच्या दबावाखाली काम करणारे नेते म्हणून त्यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात कार्यकर्त्यांचा वाढता प्रभाव, तसेच ग्रामीण भागातील मजबूत संघटनात्मक पायाभूत रचना याबद्दलही देशमुखांनी भाष्य केले. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. या पक्षाचा पाया मजबूत आहे आणि तो लोकांमुळेच जिवंत आहे, असे ते म्हणाले.

Local Body Elections : नगराध्यक्षपदावरून रावळ–इंगळे ‘आऊट’!

राजकीय वातावरण आधीच तापले असताना देशमुखांच्या या टीकेने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. आगामी स्थानिक निवडणुका आणि राज्यातील बदलणारी राजकीय समीकरणे लक्षात घेतली तर विखे पाटील आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.