Shinde faction MLA Sanjay Shirsat warning is in the news : शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाट यांचा इशारा चर्चेत
Mumbai: महाराष्ट्राच्या महायुतीत अंतर्गत नाराजी, फोडाफोडी आणि पैशांच्या राजकारणावरून वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या तीक्ष्ण वक्तव्यामुळे नवं राजकीय वादळ उठले आहे. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी आरएसएस लिहिलेला टी-शर्ट घातल्यापासून सुरू झालेल्या वादावर भाष्य करताना शिरसाट यांनी भाजपला थेट आव्हान दिले. “मागच्या वेळी मोदी साहेब आणि शिंदे साहेबांवर टीका केली, आम्ही उत्तर दिले. आता संघावरच टीका करायची हिम्मत आलीय, याचे उत्तर भाजपने द्यावे,” असे ते म्हणाले. यानंतर महायुतीतील आतल्या घडामोडींवर त्यांनी आणखी स्फोटक विधानांची मालिका सुरू झाली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीतील तणाव वाढत असल्याचे सांगत शिरसाट म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि एनसीपीमध्ये ‘अलिखित करार’ असताना काही नेत्यांना पैशांची मस्ती आली असून त्याच्या जोरावर फोडाफोडी सुरू आहे. या संदर्भात ते एकनाथ शिंदेंना अहवाल देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नका. संयम पाळलाय, पण त्याचीही मर्यादा असते,” असा खुला इशारा त्यांनी दिला. फुलंब्री, गंगापूर आणि वैजापूरमध्ये सुरू असलेल्या तणावाकडे लक्ष वेधत त्यांनी म्हटले की, अशीच परिस्थिती राहिली तर महायुतीचे अस्तित्व धोक्यात येईल आणि निवडणूक लढवणेच कठीण होईल. “ॲक्शनला रिॲक्शन असणारच,” असा इशारा त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या दिला.
Local body election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा कळस! शिंदे गट व भाजपचे नवे ‘फॅमिली पॅक’
भाजपच्या प्रवेश राजकारणावरही शिरसाट यांनी थेट हल्ला चढवला. “लोक ऑप्शन शोधतात याचा अर्थ प्रवेश द्या असा होत नाही. बावनकुळे सगळीकडे होते, त्यांना माहितीच आहे. असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ! आम्ही भाजपचे लोक घेत नाही, मग त्यांनी आमच्या गटात फोडाफोड करणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या अधिकारांची कबुली देत त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री हेच सर्वोच्च आणि अंतिम निर्णय घेणारे असतात. “तिजोरी कुणी सांभाळत असेना, पण विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.
Devendra Fadnavis : निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा डाव, राज्यात ‘भाकरी फिरणार’!
अंबेजोगाईत विकासाबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावरही शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली. “ते त्यांनी बारामतीपुरते म्हटले असावे. प्रत्येक नेत्याला आपला भाग जवळचा असतो,” अशी सौम्य टीका केली. न्यायालयीन निकालाबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, आकडेवारीतील तफावत लक्षात घेतली गेल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
घराणेशाहीबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “घराणेशाही लाट आलेली आहे, हे खरे आहे, पण लोकशाहीत आत्मविश्वास असेल तर जनता स्वीकारते,” असे ते म्हणाले. बीडमधील राजकीय घडामोडींवरून धनंजय मुंडेंना उद्देशून त्यांनी चिमटा काढत म्हटले, “बीडची बातमी नाही आली तर पेपर वाचल्यासारखे वाटत नाही. आज कराडची आठवण आली, उद्या आणखी कुणाची येईल.” संजय शिरसाट यांच्या या सलग विधानांमुळे महायुतीत नाराजीचा ज्वालामुखी अधिकच फूटत असल्याचे चित्र राज्याच्या राजकीय वर्तुळात स्पष्ट दिसू लागले आहे.
_____








