Talk of self-reliance than mahayuti, threat to allies including opposition : महायुतीपेक्षा स्वबळाचीच चर्चा, विरोधकांसह मित्रपक्षाला धडकी?
Mumbai: राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असून सर्वाधिक हालचाल भारतीय जनता पक्षात पाहायला मिळत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने दीर्घकाळ चाललेले प्रशासकीय राज संपुष्टात येणार आहे. मात्र या निवडणुकांत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची अक्षरशः भाऊगर्दी उसळली असून अनेक महापालिकांमध्ये महायुती नको, स्वबळावरच लढावे, असा सूर स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहे.
सध्या भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटातील “वल्लाह खोस रक़्सा” हे गाणे गाजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण एका-एका प्रभागातून भाजपकडून लढण्यासाठी 10 ते 15 पेक्षा अधिक दावेदार रिंगणात उतरले आहेत. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये हेच चित्र असून इच्छुकांची संख्या पाहून पक्षनेतृत्वालाही सुखद धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Supriya Sule meets Amit Shah : सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला राजकीय वर्तुळाचे लक्ष !
पक्षश्रेष्ठींनी जरी महायुती एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवणार असल्याचा नारा दिला असला, तरी स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मात्र महायुतीला ठाम विरोध करत स्वबळाची मागणी करत आहेत. विशेषतः ज्या महापालिकांमध्ये भाजपची ताकद भक्कम आहे, तेथे मित्रपक्षांना जागा देण्यास कार्यकर्त्यांची मानसिकता तयार नसल्याचे चित्र आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपने मागील निवडणुकीत 108 जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत शिवसेनेला केवळ दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. या पार्श्वभूमीवर नागपुरात महायुती करावी की ‘एकला चलो’ची भूमिका घ्यावी, यावर भाजपमध्येच मतभेद असल्याची चर्चा आहे. नागपुरात एका जागेसाठी सरासरी 15 हून अधिक इच्छुक असल्याचे वास्तव स्वबळाच्या भूमिकेला अधिक बळ देणारे ठरत आहे.
Municipal election : 15 ला मतदान, 16 जानेवारीला निकाल, आजपासून आचारसंहिता
दरम्यान, महापालिका निवडणूक जाहीर होताच काँग्रेसही आक्रमक झाली असून ही लढत भाजपसाठी सोपी नसेल, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. भाजपसाठी सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर काँग्रेससाठी सत्तेची संधी म्हणून ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रचारात झंझावात पाहायला मिळणार आहे. तर काँग्रेसकडून विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारखे नेते मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
नागपूर महापालिकेची घोषणा होताच भाजपच्या गोटात उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रभाग पातळीवरील निरीक्षकांच्या प्राथमिक मुलाखतीनंतर आता भाजपच्या गणेश पेठ कार्यालयात उमेदवारांच्या अधिकृत मुलाखती सुरू होत आहेत. 16 ते 19 डिसेंबरदरम्यान या मुलाखती होणार असून पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण, दक्षिण-पश्चिम आणि मध्य नागपूर अशा विभागनिहाय मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र निवडणूक संचालन समितीही गठित करण्यात आली आहे.
Nitin Gadkari : मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचाय
सोलापूर महानगरपालिकेतही भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तब्बल 1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून तीन दिवसांचे मुलाखत सत्र आयोजित करण्यात आले आहे. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी ही माहिती दिली. मुलाखतीसाठी इच्छुकांनी एकट्याने उपस्थित राहावे, कोणतेही शक्तीप्रदर्शन करू नये, असे स्पष्ट निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत. या मुलाखत प्रक्रियेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शहरातील आमदार उपस्थित राहणार आहेत.
एकंदरीत महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी महायुती की स्वबळ, या प्रश्नावरून अंतर्गत चाचपणी सुरू असल्याचे स्पष्ट चित्र राज्यभरात दिसून येत आहे.
__








