Changes in traffic arrangements in the district on counting day : खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व चिखलीत पर्यायी मार्ग लागू
खामगाव : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर रोजी होत असून, या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व चिखली या शहरांतील वाहतूक तात्पुरती एक दिवसासाठी वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मतमोजणीच्या दिवशी ग्रामीण व शहरी भागातून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येण्याची शक्यता लक्षात घेता, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहतूक बदलाची शिफारस केली होती. त्यानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक बदलाचे आदेश निर्गमित केले आहेत.
खामगाव शहरात नांदुरा–खामगाव या प्रचलित रस्त्यावरील वाहतूक नांदुरा ते जयपूर लांडे पुलावरून खाली उतरून खामगाव बसस्थानकापर्यंत वळविण्यात आली आहे. जलंब–खामगाव मार्गावरील वाहतूक जलंब–शेगाव मार्गे खामगावकडे येणार आहे. तसेच आकोट व वरवट बकालकडून येणारी अवजड वाहतूक सकाळी ६ वाजेपासून अग्रसेन चौक बसस्थानकासमोरून अण्णाभाऊ साठे चौक, मुरारका विद्यालय चौक मार्गे खामगावकडे वळविण्यात येणार आहे.
शेगाव शहरात जुने तहसील कार्यालय ते रेल्वे स्टेशन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून, खामगावकडून येणारी वाहतूक जगदंबा चौक मार्गे अग्रसेन चौक–शेगाव मार्गाने जाणार आहे.
जळगाव जामोद शहरात दुर्गा चौक व तहसील चौक या प्रचलित मार्गावरील वाहतूक दुर्गा चौकाच्या कॉर्नरवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयासमोरून एस.टी. स्टँडकडे जाणाऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.
MSRTC : जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! एसटीच्या ताफ्यात १२ ईव्ही बसेस
दरम्यान, चिखली शहरात सिद्ध सायन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्थानक या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बंदी आदेश २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहणार असून, नागरिक व वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे. मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








