BJP benefits from the changed political equations : नगरपालिका निवडणुकीत आघाडीवर, ६ नगराध्यक्षपदे जिंकली
Amravati विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपला काही अंशी यश मिळाले असून, विद्यमान तसेच माजी आमदारांनी आपले गड बहुतांशी कायम राखले आहेत. तब्बल १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी १० नगरपरिषदांसह २ नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. यात भाजपचे ६ नगराध्यक्ष विजयी झाले. काँग्रेसला २ तर प्रहार, उद्धवसेना, शिंदेसेना आणि स्थानिक आघाडीला प्रत्येकी १ नगराध्यक्षपद मिळाले.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर दोन टप्प्यांत पालिका निवडणुका पार पडल्या. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर, तर दुसऱ्या टप्प्यात २० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यांची मतमोजणी रविवारी (२१ डिसेंबर) सकाळी १० वाजता सुरू झाली. अचलपूर वगळता दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
Local Body Elections : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश
राज्यातील सर्वात लहान नगरपरिषद असलेल्या चिखलदऱ्याचा निकाल सर्वात आधी जाहीर झाला. भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या नगरपरिषदेत काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर यांनी विजय मिळवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीला येथे लगाम बसल्याची चर्चा रंगली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सात तर महाविकास आघाडीचा एक आमदार विजयी झाला होता. त्यामुळे कोणते आमदार आपले गड राखतात, याकडे लक्ष लागले होते. दर्यापूर मतदारसंघातील उद्धवसेनेचे आमदार गजानन लवटे वगळता इतर आमदारांना संमिश्र यश मिळाले. माजी मंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजारमध्ये, तर दर्यापूरचे माजी आमदार व खासदार बळवंत वानखडे यांनी दर्यापूरमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या गडाला मात्र यावेळी खिंडार पडले. मोर्शीतील विजयानंतर शिंदेसेनेने जिल्ह्यात खाते उघडले, हे विशेष ठरले.
या निवडणुकांमुळे चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन आता लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरू होणार आहे.
Local Body Elections : एकही आमदार नव्हता तेव्हा सात नगराध्यक्ष होते, आता…
पक्षनिहाय विजयी नगराध्यक्ष
भाजप : धारणी, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, वरुड, शेंदूरजना घाट, अचलपूर
काँग्रेस : चिखलदरा, दर्यापूर
प्रहार : चांदूर बाजार
शिंदेसेना : मोर्शी
उद्धवसेना : नांदगाव खंडेश्वर
स्थानिक आघाडी : चांदूर रेल्वे
धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे यांनी दुहेरी लढतीत नगराध्यक्षपदी विजय मिळवला. अकोटचे भाजप आमदार प्रताप भारसाकळे यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांचा पराभव झाला. त्यांच्या जाऊबाई व काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे विजयी झाल्या. दर्यापूरचे उद्धवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव अंजनगाव सुर्जी येथून निवडणूक रिंगणात होते. त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.
कुठे गड अभेद्य, तर कुठे खिंडार
आ. प्रताप अडसड : धामणगाव नगरपरिषद राखली; मात्र चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे भाजपचा पराभव
आ. उमेश यावलकर : वरुड व शेंदूरजना घाट येथे भाजप विजयी; मोर्शी गमावली
आ. प्रवीण तायडे : अचलपूरमध्ये विजय; चांदूर बाजारमध्ये पराभव
आ. केवलराम काळे : धारणी नगरपंचायत कायम; चिखलदरा नगरपरिषद गमावली
आ. गजानन लवटे : दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे उद्धवसेनेचा पराभव








