BMC Election 2026: राज–उद्धव ठाकरे यांची युती जाहीर होताच भाजप सतर्क

Preparations to increase space for Shinde group in Mumbai, but tension remains : मुंबईत शिंदे गटासाठी जागा वाढवण्याची तयारी, मात्र तिढा कायम

Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना- मनसे युतीची घोषणा करताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईतील मराठी मतदारांवर या युतीचा प्रभाव पडू शकतो, हा धोका ओळखत भाजपने आपल्या रणनीतीत बदल करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी अधिक जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत पहिल्या टप्प्यात भाजपकडून शिंदे गटासाठी 227 पैकी केवळ 52 वॉर्ड लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकींमध्ये भाजपने भूमिका काहीशी नरमवत शिंदे गटाला 70 जागा देण्याचा नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. मात्र, शिवसेनेकडून थेट 100 जागांची मागणी करण्यात आल्याने दोन्ही पक्षांमध्ये अद्याप 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे.

Municipal election : आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा*”

भाजपने 100 जागांचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती असून जागावाटपावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आज पुन्हा भाजप आणि शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मुंबईतील उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती आहे. मुंबई भाजपच्या कोअर कमिटीकडून अंतिम यादी स्वरूपात काही उमेदवारांची नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेदिवशीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी सिनेट सदस्य आणि पक्षाचे सचिव तसेच राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सुधाकर तांबोळी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर गेली 19 वर्षे सुधाकर तांबोळी मनसेत सक्रिय होते. दोन वेळा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची निवड झाली होती. मात्र, मागील काही काळापासून पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

Municipal Council : पहिल्याच सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित

एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजप–शिवसेना जागावाटपाचा तिढा, तसेच मनसेतील फूट या सर्व घडामोडींमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.