BJP–Shivsena alliance collapses after denial of 25-seat demand : ऐनवेळी चर्चा फिसकटली, जागावाटपाचा तिढा कळीचा
Amravati राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढवत असताना, अमरावतीमध्ये मात्र ‘महायुती’ला सुरुंग लागला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने, अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) ने अमरावती महापालिकेच्या एकूण ८७ जागांपैकी २५ जागांची आग्रही मागणी भाजपकडे केली होती. मात्र, भाजप केवळ १५ ते १६ जागा देण्यास तयार होती. जागांच्या संख्येवरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकले नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Amravati Municipal Corporation Elections : काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक, या मुद्यावर एकमत
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये युती तुटण्यामागची कारणे आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे भाजपच्या गोटातही चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. जागावाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाचा तिढा न सुटल्याने अमरावतीत भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१७ च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर मुसंडी मारत बहुमत मिळवले होते. भाजपने ४५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला १५, शिवसेनेला ७, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमला १०, तर मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला ५ जागा मिळाल्या होत्या. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने ३ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय आरपीआय (आठवले गट) आणि एका अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा मिळवली होती.
Akola Municipal Corporation : महाविकास आघाडीची चर्चा यशस्वी, जागावाटपावर पडदा कायम
अमरावतीत १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट फायदा काँग्रेस किंवा एमआयएमसारख्या विरोधी पक्षांना होऊ शकतो. सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.








