Our fight is directly with BJP, Shinde group – Ambadas Danve venomous criticism : आमची लढत थेट भाजप आणि शिंदे गटाशीच – अंबादास दानवेंची जहरी टीका
Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. इम्तियाज जलील हे भाजपचेच हस्तक असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला व्यसन लावले आहे, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
इम्तियाज जलील यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी हा हल्ला राजकीय असून हल्लेखोर गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे संरक्षण असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. काळे धंदे करणारा हा व्यक्ती पैशाच्या बळावर आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने निवडून येतो. शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी केले असून त्यांना भाजपचाच पाठिंबा आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
Raj Thackeray : मोदींची जादू नसती तर भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळला असता
आमची लढत इम्तियाज जलील यांच्याशी नाहीच, असे स्पष्ट करत अंबादास दानवे म्हणाले की, आमची राजकीय लढाई थेट भाजप आणि शिंदे गटाशी आहे. इम्तियाज जलील यांच्याशी आमचा कोणताही संघर्ष नाही. उलट शिंदे गटातच एकमेकांविरोधात आव्हाने उभी राहत असून त्यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरूनही अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली. कालचा कार्यक्रम हा टॉक शो नव्हता तर फेक शो होता, असा घणाघात करत त्यांनी फडणवीसांनी शहराबाबत एक शब्दही ठोसपणे बोलला नाही, असा आरोप केला. फडणवीसांनी सभा घ्यायला हवी होती, मात्र भाजप सभेला घाबरून टॉक शोच्या माध्यमातून पळ काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाषणात फडणवीस सर्वत्र एकच स्क्रिप्ट वापरतात, फक्त शहरांची नावे बदलतात, बाकी सगळे शब्द तेच असतात, अशी टीकाही दानवे यांनी केली.
समृद्धी महामार्गासाठी घेतलेल्या जमिनींच्या मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही अडवणूक केली नसती तर शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या असत्या. शेतकऱ्यांना पाचपट दर मिळवून दिला. आमचा जमिनी देण्याला विरोध नव्हता, तर कमी दराला विरोध होता. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी मैदानात उतरले होते, असे प्रत्युत्तरही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.
Ganesh Naik : ‘माझा पोरगा चोर आहे, असं बापाने बोलू नये’; गणेश नाईकांचा विरोधकांना जळजळीत टोला
शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरही दानवे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. छत्रपती संभाजीनगरला वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ४४ दिवस पाणी मिळाले. शहराला सध्या १४० एमएलडी पाणी मिळते, मात्र गरज २४० एमएलडीची आहे. फडणवीसांनी केवळ तारखा दिल्या, प्रत्यक्षात पाणी दिलेले नाही. लबाडांनो, आधी पाणी द्या, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार सुरू असल्याचे सांगत अंबादास दानवे म्हणाले की, दहा तारखेला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर प्रचाराचा शेवटचा टप्पा पार पडेल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.








