Assam Violence : आसाममध्ये जमिनीच्या वादातून हिंसाचार; संतप्त आंदोलकांनी भाजप नेत्याचे घर पेटवले!

Violence erupts over land dispute : आरक्षित जमिनींवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून संघर्षाचा भडका; कर्फ्यू लागू, सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात

Guwahati आसाममधील वेस्ट कार्बी आंगलाँग जिल्ह्यात जमिनीच्या एका जुन्या वादाने अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू असलेले उपोषण आणि भूसंपादनाचा वाद विकोपाला गेल्याने संतप्त आंदोलकांनी भाजप नेते आणि कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे (KAAC) मुख्य कार्यकारी सदस्य तुलिराम रोंगहांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांत कर्फ्यू लागू केला आहे.

या वादाचे मूळ ‘PGR’ (Professional Grazing Reserve) आणि ‘VGR’ (Village Grazing Reserve) या आरक्षित चराई जमिनींमध्ये आहे. या जमिनी केवळ आदिवासी समुदायांसाठी असून बिगर-आदिवासी लोकांनी त्यावर अवैध अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक आदिवासी संघटनांनी केला आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पेलांगपी येथे आंदोलन सुरू होते. सोमवारी सकाळी पोलिसांनी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी गुवाहाटीला हलवले, मात्र पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्याचा गैरसमज पसरल्याने जमावाचा संयम सुटला आणि हिंसाचार उफाळला.

BMC Election 2026 : मुंबईच्या रणधुमाळीत ‘मस्त-मस्त’ तडका, रवीना टंडन ठाकरेंसाठी मैदानात!

संतापलेल्या आंदोलकांनी डोंकामुकाम येथील तुलिराम रोंगहांग यांच्या वडिलोपार्जित घरावर मोर्चा वळवला आणि घराला आग लावून दिली. सुदैवाने, या घटनेच्या वेळी रोंगहांग किंवा त्यांचे कुटुंबीय घरात नव्हते, केवळ सुरक्षा रक्षक तैनात होते. केवळ घरच नव्हे, तर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली, ज्यामध्ये काही पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) जवान जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा वापर करावा लागला असून खरोनी भागातही याचे पडसाद उमटले आहेत.

BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी

हिंसाचारानंतर परिसरात सीआरपीएफ, विशेष पोलीस कमांडो आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. तुलिराम रोंगहांग यांनी आंदोलकांना चर्चेसाठी दिफू येथे बोलावले असून, हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने सरकार थेट कारवाई करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. “आम्ही उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना रुग्णालयात हलवले होते, त्यांना अटक केलेली नाही,” असे स्पष्टीकरणही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती निवळण्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.