Amravati Municipal Election 2026 : भाजप-युवा स्वाभिमान युती तुटल्यानंतर संघर्षाचा भडका; बोंडे आणि पोटे-पाटलांचा ‘डबल ढोलकी’ प्रवृत्तीवर हल्ला
Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. सोमवारी साईनगर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टीका केली. “भाजपमध्ये राहून दुटप्पी राजकारण करू नका,” अशा शब्दांत नेत्यांनी राणा दांपत्यावर टीका केली आहे.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी नवनीत राणा यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. ते म्हणाले, “काही लोक सध्या दुहेरी ढोलकी वाजवत आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसून भाजपचा प्रचार करायचा आणि मुख्यमंत्री जाताच भाजप उमेदवारांच्या विरोधात आपल्या कुटुंबाच्या पक्षाचे काम करायचे, ही कसली नीती?” त्यांनी पुढे मतदारांना उद्देशून थेट सवाल केला की, “आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला कोणतं कमळ निवडायचं आहे—असली की नकली?” बोंडे यांच्या या विधानाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवनीत राणा यांच्या भूमिकेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sajid Khan Pathan : एमआयएमच्या कुबड्यावर भाजप पदाधिकाऱ्याची नगरपरिषदेत एन्ट्री
याच सभेत बोलताना प्रवीण पोटे पाटील यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षावर (वायएसपी) शरसंधान साधले. “भाजपने मोठ्या मनाने युतीमध्ये त्यांना ९ जागा दिल्या होत्या, पण त्यांची भूक २७ जागांची होती. भाजपचे बोट धरून चालणाऱ्यांना इतकं दिल्यावरही समाधान लाभले नाही,” अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी राणांचा उल्लेख करत म्हटले की, “आमचे काही नेते सोबत चालतात पण प्रत्यक्षात आमचाच खिसा कापतात. भाजप आज स्वबळावर मजबूत आहे, आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही.
Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; मुंबई महापालिकेत ठरणार ‘गेमचेंजर’?
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वीच रवी राणा यांच्या पक्षासोबतची युती अधिकृतपणे तोडल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपच्या व्यासपीठावरून राणा दांपत्यावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. साईनगर प्रभागातील सुजाण नागरिक कोणत्याही संभ्रमात पडणार नाहीत आणि भाजपलाच विजयी करतील, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. मात्र, पक्षांतर्गत असलेल्या या उघड संघर्षामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी भाजपमधील ही अंतर्गत यादवी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्यातरी ‘असली-नकली’च्या वादाने अमरावतीचे राजकारण पूर्णपणे तापले आहे.








