Akola municipal corporation : अकोल्यात भाजपला रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची जोरदार मोर्चेबांधणी!

Opposition unity: MVA gears up strongly to stop the BJP : सत्तेच्या समीकरणात काँग्रेसचे निर्णायक पाऊल; भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू

Akola अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ८० जागांच्या महापालिकेत भारतीय जनता पक्ष ३८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४१ या जादुई आकड्यापासून तो अजूनही तीन पावले दूर आहे. नेमकी हीच संधी साधून काँग्रेसने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आक्रमक रणनीती आखली असून, “आम्हाला पदे नकोत, पण भाजप नको” अशी भूमिका घेत मित्रपक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

अकोल्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ३ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, विरोधी पक्षांनी ही जागा भरून काढण्यासाठी समांतर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने (२१ जागा) पुढाकार घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून अपक्ष नगरसेवकांचे महत्त्व वाढले आहे.

Municipal Elections: मोठी खळबळ! अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजपा–एमआयएमची थेट युती

अकोल्यात भाजपविरोधी आघाडीची मोट बांधण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने हालचाली तीव्र केल्या आहेत. काल रात्री उबाठाच्या आमदारांशी झालेली बैठक आणि आज होणारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी चर्चा, यावरून अकोल्यात ‘महाविकास आघाडी’ अधिक ‘वंचित’ असा नवा प्रयोग यशस्वी होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. “आमचे नगरसेवक एकजूट आहेत आणि आम्ही भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असा विश्वास विरोधी गोटातून व्यक्त केला जात आहे.

Mayor Reservation : राज्यातील १५ शहरांत ‘महिला राज’! मुंबई, नागपूर, पुण्यासह २९ महापालिकांचे आरक्षण जाहीर

निवडणूक निकालानंतर अनेक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चांनी शहरात उधाण आले आहे. भाजपकडे काही अपक्ष नगरसेवक असल्याचा दावा केला जात असला, तरी विरोधकांनी तो फेटाळून लावला आहे. “भाजपकडे केवळ त्यांचेच संख्याबळ आहे, कोणताही नवा सदस्य त्यांच्या संपर्कात नाही,” असा दावा काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे, उबाठाच्या आमदारांनी आपल्या सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवून कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.