SIR in Buldhana : ‘एसआयआर’ लागू करण्याच्या हालचाली; बुलढाणा जिल्ह्यात पूर्वतयारी सुरू

Election commission directed BLO to start process : निवडणूक विभागाने बीएलओंना लावले कामाला; प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी होणार

Khamgao काही राज्यांमध्ये राजकीय चर्चेचा विषय ठरलेला मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ (एसआयआर) महाराष्ट्रातही लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक विभागाने पूर्वतयारीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कामाला लागल्याचे चित्र आहे.

राज्यात लवकरच एसआयआर कार्यक्रम राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळणे, दुबार नोंदी हटवणे तसेच मतदारांच्या तपशिलांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून मतदार यादी अधिक अचूक व शुद्ध करण्याचा उद्देश आहे.

घरोघरी जाऊन पडताळणी

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. बीएलओ घरोघरी भेट देत मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. सध्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यात बीएलओंमार्फत मतदार याद्यांचे मॅपिंग सुरू असून, अनेक ठिकाणी मतदारांना या प्रक्रियेबाबत पूर्वसूचना देण्यात येत आहेत.

Zilla Parishad elections : आधीच खर्चाचा धडाका; प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार?

२००२ च्या मतदार यादीचा आधार

एसआयआर प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदारास सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा वडील, आई, आजोबा अथवा आजी यांचे नाव आवश्यक राहणार आहे. यासोबतच दोन अद्ययावत पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे सादर करणे बंधनकारक असून, भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या १३ कागदपत्रांपैकी जन्मतारखेनुसार योग्य असे कागदपत्र सादर करणेही अनिवार्य आहे.

४० वर्षांखालील मतदारांसाठी विशेष सूचना

ज्या मतदारांचे वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नाही, अशा मतदारांनी वडील, आई, आजोबा किंवा आजी यांचे नाव सादर करणे आवश्यक राहणार आहे.

संबंधित नावे शोधण्यासाठी मतदारांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘SIR 2002’ टॅब किंवा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Search SIR’ पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vidarbha Farmers : प्रशासन गप्प, शेतकरी आक्रमक! सोलर कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या

जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय बीएलओ संख्या

खामगाव – ३२२

बुलढाणा – ३३७

चिखली – ३१७

मेहकर – ३०५

जळगाव जामोद – ३५०

सिंदखेड राजा – ३१७
एकूण बीएलओ : २,२८८

संभ्रम वाढतोय; प्रशासनाचे स्पष्टीकरण

बीएलओंमार्फत सुरू असलेल्या या पडताळणीमुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या २९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मतदार यादीचे सन २००२ च्या यादीशी मॅपिंग करण्याचे काम सुरू असून, यामध्ये नाव, वय, लिंग, छायाचित्रातील दुरुस्त्या तसेच दुबार नोंदी कमी करण्यासाठी मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.