Ten-years-report-on-farmer-suicides-in-buldhana-taluka-hotspot-distress : शासकीय आकडेवारीतून वास्तव उघड; कर्ज आणि निसर्गाच्या दुष्टचक्रात बळीराजाचा श्वास कोंडला
Buldhana विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र थांबण्याचे नाव घेत नसून, गेल्या १० वर्षांच्या शासकीय आकडेवारीने अंगावर काटा आणणारे वास्तव समोर आणले आहे. २०१५ ते २०२५ या कालावधीत एकट्या बुलढाणा तालुक्यात १७१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, हा तालुका जिल्ह्याचा ‘सुसाईड हॉटस्पॉट’ ठरला आहे. बँकांचा तगादा, खासगी सावकारीचा पाश आणि निसर्गाची अवकृपा यांमुळे बळीराजा हतबल झाला आहे.
जिल्ह्यात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी सर्वाधिक प्रमाण हे बाजारपेठेशी जवळ असलेल्या तालुक्यांमध्ये दिसून आले आहे. बुलढाणा (१७१), खामगाव (१५१) आणि चिखली (१४६) या तीन तालुक्यांनी आत्महत्यांच्या संख्येत आघाडी घेतली आहे. या भागातील शेतकरी अधिक जोखीम असलेल्या पिकांकडे वळला असून, कर्जबाजारीपणाचे प्रमाणही येथे जास्त असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मोताळ्यात ११७ तर जळगाव जामोदमध्ये सर्वात कमी म्हणजे ४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे.
गेल्या दशकात २०१७ हे वर्ष सर्वात जास्त भयावह ठरले, ज्यामध्ये १५६ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. २०२० च्या कोविड काळात हा आकडा ७३ पर्यंत खाली आला होता, परंतु तो सुधारणेचा काळ नसून केवळ वसुलीला मिळालेली स्थगिती होती, हे नंतरच्या वाढलेल्या आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे. २०२३ पासून हा आलेख पुन्हा १०० च्या खाली घसरत असला, तरी तो शाश्वत दिलासा मानला जात नाहीये.
शासकीय दप्तरी नोंदवलेले हे आकडे केवळ ‘मदतीसाठी पात्र’ ठरलेल्या प्रकरणांचे आहेत. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे आत्महत्या ‘अपात्र’ ठरवल्या जातात, त्यामुळे प्रत्यक्षात मृतांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्जमाफीच्या घोषणा आणि पीकविम्याचा गोंधळ यामुळे शेतकरी आजही आर्थिक विवंचनेत आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पण सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात?
केवळ आकडेवारीचे सांत्वन नको, तर ठोस कृती हवी अशी मागणी आता जोर धरत आहे. हमीभावाचा कायदा, सूक्ष्म सिंचनाचे जाळे आणि ग्रामीण भागात मानसिक आधार देणारी केंद्रे उभारली तरच हा मृत्यूचा आलेख शून्यावर येईल. अन्यथा, ही ‘घटती संख्या’ केवळ कागदोपत्रीच उरेल आणि जमिनीवरचे संकट अधिक गडद होत राहील.








