NCP leadership : राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर घमासान, प्रफुल पटेलांच्या भूमिकेकडे लक्ष !

Office bearers strongly demand party president be given to Sunetra Pawar : पक्षाध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडे द्यावे पदाधिकाऱ्यांची ठाम मागणी

Mumbai: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाबाबत मोठ्या हालचालींना वेग आला आहे. पक्षाची सूत्रे प्रफुल पटेलांच्या हातात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे, अशी ठाम मागणी पुढे केली आहे. त्यामुळे अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या सत्ताकेंद्रावर नेमकी कोणाची पकड राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी करणारे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे. या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत.

Ajit Pawar death : बुलढाणा मेडिकल कॉलेजला ‘अजितदादां’चे नाव द्या; सर्वपक्षीय सभेत एकमुखी ठराव

या पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने पक्षावर मोठे दुःखाचे सावट पसरले आहे. अशा कठीण काळात पक्षाला एकत्र ठेवणारे, संयमी आणि सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून पक्ष आणि महाराष्ट्राप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी पाहता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सर्वार्थाने योग्य असल्याचा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाल्याचे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. गोयल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला. मात्र, त्यानंतर गोयल यांनी याबाबत यु-टर्न घेत, आपल्याला एका वरिष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिल्याचे स्पष्टीकरण दिले होते. अधिकृत माहिती न घेता आपण हे वक्तव्य केल्याचे मान्य करत, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पण सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात?

या पार्श्वभूमीवर, एकीकडे प्रफुल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत असताना, दुसरीकडे पक्षातील आमदार आणि आता प्रमुख पदाधिकारीही सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत निर्णायक टप्पा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्रीपदानंतर सुनेत्रा पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही स्वीकारणार का, की राष्ट्रवादीची सूत्रे वेगळ्या हातात जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.