Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिकेत वडेट्टीवार ‘बॅकफूट’वर; धानोरकरांना दिल्लीचे झुकते माप!

congress-leader-vijay-wadettiwar-compromises-in-chandrapur-mayor-election : खासदार समर्थकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ; वडेट्टीवार गटाची उपमहापौरपदी बोळवण

Nagpur चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात अखेर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या तख्तावर सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात केंद्रीय नेतृत्वाचा कौल धानोरकर गटाच्या बाजूने लागला असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना बॅकफुटवर यावे लागले आहे. महापौरपद आपल्या समर्थकाकडे राहावे यासाठी अडून बसलेल्या वडेट्टीवारांची केवळ उपमहापौर पदावर बोळवण करत हायकमांडने त्यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या २७ जागा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत यादवी सुरू झाली होती. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाने स्वतंत्र गटनोंदणी करत परस्परांविरुद्ध दंड थोपटले होते. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रतिभा धानोरकर यांचा शब्द अंतिम मानला गेला.

Municipal Election: चंद्रपुरात काँग्रेसची गटबाजी, भाजपची हालचाल अन् ठाकरे गटाची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

खासदार धानोरकर यांच्या समर्थकाला अडीच वर्षांसाठी महापौरपद बहाल करण्यात आले आहे. वडेट्टीवार गटाला मिळालेले हे पद ‘रबर स्टँप’ मानले जात असल्याने समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे. वडेट्टीवारांच्या समर्थकांना आता स्वतंत्र गट विसर्जित करून धानोरकरांनी स्थापन केलेल्या अधिकृत गटात सामील व्हावे लागणार आहे.

काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी ६ नगरसेवकांची गरज असताना, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीसोबत ८ नगरसेवकांचा मजबूत गट तयार केला होता. सुरुवातीला महापौरपदाचा हट्ट धरणाऱ्या ठाकरे सेनेला मुंबईतून आलेल्या आदेशांनंतर नरमाईची भूमिका घ्यावी लागली. मात्र, त्या बदल्यात महापालिकेतील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ‘स्थायी समिती’ त्यांना देण्याचे निश्चित झाले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा ‘फॉर्म्युला’ दिल्लीत ठरवण्यात आला आहे.

Mayoral election : मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपणार;

आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याचा दावा करणाऱ्या वडेट्टीवारांना या प्रक्रियेत दुहेरी फटका बसला आहे. आधी त्यांना स्थायी समिती देऊ करण्यात आली होती, मात्र नव्या तडजोडीत ते पदही हातातून गेले. चंद्रपूरचे रहिवासी नसतानाही शहराच्या राजकारणात ‘लुडबूड’ करत असल्याचा धानोरकरांनी केलेला आरोप आणि दिल्लीतील निकाल पाहता, वडेट्टीवारांच्या वर्चस्वाला चंद्रपुरात खिळ बसल्याचे बोलले जात आहे.