Irregular water supply sparks women-led agitation at the Zilla Parishad : अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात शेकडो महिलांचा जिल्हा परिषदेत एल्गार
Buldhana महाजल आणि जलजीवन मिशनसारख्या गाजलेल्या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रायपूर गावातील नागरिकांना आजही थेंबाथेंबासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असून, या प्रशासकीय अपयशाविरोधात आज संतप्त महिलांचा उद्रेक पाहायला मिळाला.
दोन महिने झाले तरी नळाला पाणी नाही, आठवड्यातून एकदाही नियमित पुरवठा होत नाही, असा आक्रोश करत शेकडो महिलांनी बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी थेट जिल्हा परिषद गाठत कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडक दिली. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून, घरगुती कामे, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Nana Patole : मोदी-अदानी वादावरून काँग्रेस आक्रमक; अमेरिकन व्यापारी करारावरून राजकीय रान पेटले
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर महिलांनी आपल्या व्यथा मांडताना, “जर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील, तर पाणी कुठे गेले?” तसेच “योजना कुणासाठी आहेत—लोकांसाठी की कंत्राटदारांसाठी?” असे थेट सवाल उपस्थित केले.
महाजल व जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन, टाक्या आणि इतर कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात असताना, प्रत्यक्षात मात्र रायपूरच्या नळांमधून कोरडी हवा येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या हलगर्जीपणामुळे महिलांना वेळ, श्रम आणि आरोग्य यांची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
यावेळी महिलांनी किमान आठ दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, तसेच प्रशासकीय पातळीवरील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी ठाम मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर गावाला पाणी मिळत नसेल, तर हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याचा नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.








