projects in the Ghat-below region still remain stalled Buldhana : भूमिपूजन झाले, पण काम कुठे? रखडलेल्या प्रकल्पांवरून राजकीय प्रश्न ऐरणीवर
Buldhana जिल्ह्यातील घाटाखालच्या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दोन दशकांत सिंचन, रेल्वे, उड्डाणपूल, रस्ते व शहरी वाहतूक सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मात्र घोषणा, भूमिपूजन आणि बैठका यापलीकडे प्रत्यक्ष कामांच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अनेक प्रकल्प आजही विविध टप्प्यांवर रखडलेले दिसत आहेत. परिणामी विकासाच्या दाव्यांवरून राजकीय पातळीवरही चर्चा रंगू लागली आहे.
मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या घाटाखालच्या भागात कृषी, व्यापार आणि धार्मिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा अपुरा विकास आणि रखडलेले प्रकल्प यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला अपेक्षित वेग मिळत नसल्याचे स्थानिक नागरिक व जाणकारांचे मत आहे.
सिंचन क्षेत्रात जिगाव प्रकल्पाकडे हजारो शेतकऱ्यांच्या आशा लागून आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळू शकतो. भूसंपादन, पुनर्वसन, कालवे आणि वितरण यंत्रणेची कामे काही प्रमाणात सुरू असली, तरी निधीअभावी कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
El Nino : ‘पाण्याचा सातबारा’ तयार होणार; पाणी बचत करणाऱ्यांच्या खात्यावर ‘अॅक्वा क्रेडिट्स’!
दरम्यान, खामगाव-जालना रेल्वेमार्ग प्रकल्पाकडेही विदर्भ आणि मराठवाडा जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पाहिले जाते. या प्रकल्पामुळे व्यापार, मालवाहतूक आणि प्रवासी सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अद्याप अपेक्षित वेग दिसून येत नाही.
संतनगरी शेगावमध्ये दरवर्षी लाखो भाविक दाखल होत असतात.
धार्मिक पर्यटन वाढत असताना शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताणही वाढला आहे. यावर उपाय म्हणून रिंगरोडची संकल्पना पुढे आली असली तरी अद्याप मंजुरी आणि कामांच्या प्रक्रियेत ठोस हालचाल झालेली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि नागरिकांची गैरसोय कायम आहे.
नांदुरा व जलंब परिसरातील रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. उड्डाणपूल (आरओबी) व अंडरपासच्या मागण्या अनेक वर्षांपासून होत असल्या, तरी कामांना गती मिळालेली नाही. वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांचा वेळ वाया जात असून व्यापारी हालचालींवरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
मलकापूर-चिखली मार्गाच्या रुंदीकरणासह अनेक प्रकल्पांबाबत लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याची टीका स्थानिक स्तरावर होत आहे. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पांच्या घोषणा होतात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी प्रशासन, निधी आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
Central Railway : ११६ वर्षांची प्रतीक्षा संपणार कधी? खामगाव-जालना रेल्वेमार्ग अजूनही कागदावरच
नागरिकांमध्ये नवीन घोषणांपेक्षा सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. रखडलेल्या प्रकल्पांना निश्चित वेळमर्यादा देणे, निधीची सातत्याने उपलब्धता सुनिश्चित करणे, नियमित आढावा घेणे आणि कामांच्या प्रगतीबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करणे, या प्रमुख अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.








