mahayuti-candidate-list-vidhan-parishad-election-2026-rebellion-in-eight-seats : विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली
Mumbai : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः महायुतीमध्ये अनेक ठिकाणी इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नेतृत्वाची चिंता वाढली आहे. राज्यातील किमान आठ मतदारसंघांमध्ये बंडखोरीची परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवसांत या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे.
रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरीचा झेंडा उभारला आहे. या मतदारसंघातील नाराजीमुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. या मतदारसंघातील घडामोडींनी राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनी अर्ज दाखल करून पक्ष नेतृत्वासमोर नवे आव्हान निर्माण केले आहे.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या जागेवरही नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे.
अमरावती मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक मतदारसंघात शिवसेनेने नरेंद्र दराडे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र अपक्ष म्हणून गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी अर्ज दाखल केला आहे. हे दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने या बंडखोरीची विशेष चर्चा सुरू आहे.
परभणी मतदारसंघात शिवसेनेने सईदा खान यांना उमेदवारी दिली असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे.
नांदेड मतदारसंघात भाजपचे अमरनाथ राजूरकर अधिकृत उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला आहे. प्रवीण चिखलीकर हे आमदार चिखलीकर यांचे पुत्र असल्याने या बंडखोरीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
जळगाव मतदारसंघात भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेनेच्या रेश्मा काळे आणि दीपक धांडे यांनी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातही महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही काही मतदारसंघांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे रामदास सुमठाणकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माधवगाव जवळकर आणि कृष्णा आष्टीकर यांनी स्वतंत्र भूमिका घेतली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल उमेदवार असताना नरेश ईश्वरकर आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केला आहे.
सांगली मतदारसंघात शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली असताना काँग्रेसचे संजय मेंढे आणि मयूर पाटील यांनीही अर्ज भरले आहेत. तर सोलापूरमध्ये काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर अधिकृत उमेदवार असताना शरद पवार गटाचे वसंत नाना देशमुख आणि ठाकरे गटाचे नागेश अक्कलकोटे यांनी बंडखोरी केली आहे.
दरम्यान, महायुतीतील वाढत्या बंडखोरीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सर्व नाराज इच्छुकांशी चर्चा करून त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले आहे. ४ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Atul Londhe : अतुल लोंढे लढणार की माघार घेणार?; काँग्रेसमधील संभ्रम उघड
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसमोर बंडखोरीचे संकट उभे ठाकले असले तरी महायुतीमध्ये नाराजांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या मनधरणीच्या राजकारणाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








