Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध जाण्याची शक्यता

maharashtra-rajyasabha-election-2026-six-seats-unopposed : मविआला मोठा धक्का, महायुतीचे खासदार वाढणार

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यातून लवकरच सात राज्यसभा जागा रिक्त होणार असून, सध्याच्या विधानसभेतील संख्याबळ पाहता यातील तब्बल सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सहापैकी बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुदतपूर्तीनंतर तातडीने राज्यसभेची निवडणूक होणार आहे.

२०२० साली झालेल्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि त्या वेळी संख्याबळाच्या जोरावर आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सत्तांतरानंतर मविआतील घटक पक्षांचे आमदारसंख्येचे गणित कोलमडले असून, यावेळी आघाडीला चार तर सोडाच, दोन जागा मिळवणंही अवघड असल्याचं चित्र आहे. उपलब्ध संख्याबळ पाहता मविआला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागू शकते.

BMC Mayor 2026: शरद पवारांचा ठाकरे-मनसे आघाडीला धक्का

सध्याच्या विधानसभेतील आकड्यांनुसार राज्यसभेसाठी एका उमेदवाराला ३७ मतांचा कोटा आवश्यक आहे. मविआकडे एकत्रितपणे हा कोटा पूर्ण करण्याइतपत संख्याबळ आहे, मात्र दुसरा उमेदवार उभा करण्याची ताकद आघाडीमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे मविआच्या किमान तीन जागा थेट महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

महायुतीची स्थिती मात्र अत्यंत भक्कम आहे. भाजपचे १३१, शिंदेसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४० असे मिळून महायुतीकडे २२८ आमदार आहेत. याशिवाय अपक्ष आणि मित्रपक्षांचा पाठिंबा धरल्यास हे संख्याबळ २३५ पर्यंत जाते. त्यामुळे महायुतीचे किमान सहा उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपने सातवा उमेदवार दिल्यास मात्र चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

Mumbai-Pune traffic jam : एक टँकर उलटल्याने तब्बल 32 तास वाहतूक रखडली !

राज्यसभेच्या या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे तो शरद पवार यांचे भवितव्य. शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असून, बदललेल्या राजकीय समीकरणात मविआकडून त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाईल का, याबाबत साशंकता आहे. पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते आणि राज्यसभेच्या मुदतीनंतर पुढील निर्णय घेऊ, असे विधानही केले होते. त्यामुळे आता ते कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Anniversary program : टीकेनंतर पुणे महापालिकेचा निर्णय अखेर मागे

मविआकडे मिळू शकणाऱ्या त्या एकमेव जागेवर उद्धव ठाकरे गटाचा दावा सर्वाधिक मजबूत मानला जात आहे. त्यामुळे ही जागा शरद पवार गट, काँग्रेस की ठाकरे गट यापैकी कोणाला मिळणार, यावर आघाडीतील अंतर्गत चर्चा निर्णायक ठरणार आहे.

एकूणच राज्यसभेची ही निवडणूक केवळ खासदार निवडीपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय शक्तिसमीकरणांचे स्पष्ट प्रतिबिंब ठरणार आहे. सहा जागा बिनविरोध जाण्याची शक्यता आणि मविआचा होणारा राजकीय फटका पाहता, एप्रिलमधील ही निवडणूक राज्याच्या राजकारणात आणखी एक निर्णायक टप्पा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

___