
maharashtra/zilla-parishad-panchayat-samiti-election-winner-list-2026-mahayuti : तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकत सत्ता संघर्षाआधीच आघाडी
Mumbai: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत असताना, त्याआधीच कोकणात महायुतीने मोठा राजकीय धक्का दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या तब्बल २७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, यामध्ये सर्वाधिक वाटा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ८ तर पंचायत समित्यांमध्ये १७ जागा महायुतीने कोणताही प्रत्यक्ष सामना न होता जिंकल्या आहेत.
राज्यात एकूण १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी शनिवारी मतदान झाले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक पार पडली. तब्बल ७ हजार ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याआधीच महायुतीच्या २५ हून अधिक जागा बिनविरोध निश्चित झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ZP Results : १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सत्तेचा आज फैसला
कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. ५० सदस्यसंख्येच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. तसेच १०० सदस्यसंख्येच्या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे १६ आणि शिंदे शिवसेनेचा १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. याशिवाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
महाड पंचायत समितीतील सवाने धामणे गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्याविरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये खारेपाटण येथून प्राची इस्वालकर, बांदा येथून प्रमोद कामत, जाणवली येथून रुहिता राजेश तांबे, पडेल येथून सुयोगी रविंद्र घाडी, बापर्डे येथून अवनी अमोल तेली, पोंगुर्ले येथून अनुराधा महेश नारकर, किंजवडे-सावी येथून गंगाराम लोके आणि कोळपे येथून प्रमोद पुंडलिक रावराणे यांचा समावेश आहे.
कणकवली पंचायत समितीत वरवडे येथून सोनू सावंत, नांदगाव येथून हर्षदा हनुमंत वाळके, जाणवली येथून महेश्वरी महेश चव्हाण, बिडवाडी येथून संजना संतोष राणे, हरकुळ बुद्रुक येथून दिव्या दिनकर पेडणेकर आणि नाटळ येथून सायली संजय कृपाळ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. देवगड तालुक्यात पडेल येथून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडण येथून गणेश सदाशिव राणे, बापर्डे येथून संजना संजय लाड, फणसगाव येथून समृद्धी संतोष चव्हाण, शिरगाव येथून शितल सुरेश तावडे आणि कोटकामते येथून ऋतुजा राकेश खाजनवाडकर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.
वैभववाडी पंचायत समितीत कोकिसरे येथून साधना सुधीर नकाशे, वेंगुर्ले पंचायत समितीत आसोली येथून संकेत धुरी, मालवण पंचायत समितीत अडवली मालडी येथून सीमा सतीश परुळेकर, सावंतवाडी पंचायत समितीत शेरले येथून महेश धुरी आणि दोडामार्ग पंचायत समितीत कोलझर येथून शिंदे शिवसेनेचे गणेश प्रसाद गवस हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत संपूर्ण राज्यातील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधीच कोकणात महायुतीने मिळवलेली बिनविरोध आघाडी आगामी ग्रामीण राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








