cm-devendra-fadnavis-delhi-visit-bawankule-clarification-ncp-merger-speculations : अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचाली? सुनेत्रा पवारांचाही दिल्ली दौरा
Nagpur राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक घेतलेल्या दिल्ली भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री तातडीने रवाना झाल्याने, यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा अजेंडा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चा निव्वळ तर्क असल्याचे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील आज दिल्लीला रवाना होत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण १२ फेब्रुवारीला होणार असल्याचे दावे केले जात आहेत. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी विलीनीकरणाचे वृत्त फेटाळून लावले असले, तरी सर्व बडे नेते एकाच वेळी दिल्लीत असल्याने संभ्रम वाढला आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शिंदे गट हे अमित शहा यांनीच निर्माण केले असून तेच या दोन्ही गटाचे मालक आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावर केली आहे. बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. “मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक दिल्ली भेटीमागे राजकारणच नसते. देवेंद्र फडणवीस हे विकासाचे प्रश्न आणि राज्याच्या प्रलंबित मागण्या घेऊन सातत्याने दिल्लीला जात असतात, असे बावनकुळे म्हणाले.
Raj Thackeray : मराठी अस्मिता हा आजार नव्हे, तर बाणा, सरसंघचालकांच्या विधानावर राज ठाकरे संतप्त
राज्याचा आगामी अर्थसंकल्प मुख्यमंत्रीच सादर करणार आहेत. त्या संदर्भात केंद्राकडून काही आर्थिक तरतुदी आणि तांत्रिक चर्चा करण्यासाठी ते मोदींना भेटायला गेले असावे, असा दावा बावनकुळेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यायचे की नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा भाजपशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्रीपदाची आणि अबकारी व क्रीडा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या सदिच्छा भेटीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एकाच वेळी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिल्लीत उपस्थित राहिल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








