maharashtra-rain-red-alert-palghar-raigad-orange-alert-mumbai-thane-heavy-rain : सर्वदूर बरसणार कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट
Mumbai : राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन करत अनेक भागांना झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि इतर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत २४ तासांत सुमारे २०० मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि काही ठिकाणी स्थानिक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून धामणे आणि कवडास धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. जव्हार आणि मोखाडा परिसरातील पाणीटंचाई कमी होण्याची चिन्हे दिसत असून भात लागवडीच्या कामालाही वेग मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी लागली. काही सखल भागांमध्ये पाणी साचले असले तरी त्याचा निचरा लवकर झाल्याने मोठा अडथळा निर्माण झाला नाही. मात्र पूर्व द्रुतगती मार्गासह घोडबंदर मार्ग, कल्याण आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
रायगड जिल्ह्यासाठी २ ते ४ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे जिल्ह्यात अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नद्या-नाल्यांना पूर येणे, सखल भागांत पाणी साचणे आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना पुढील आदेश मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै रोजी यलो अलर्ट तर ३ ते ५ जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने, तर काही ठिकाणी ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा देणारा तिसऱ्या क्रमांकाचा बावटा फडकविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर शहरात रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दीर्घकाळ प्रखर उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Sachin Ahir : सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
भंडारा जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पाऊस झाल्यानंतर सायंकाळी अनेक तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांपासून खोळंबलेली भात लागवड आणि पेरणीची कामे आता वेगाने सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








