sudhir-mungantiwar-kingmaker-chandrapur-municipal-corporation-mayor-election-analysis : अचूक रणनीती आणि चाणक्यनीतीमुळे काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपचा महापौर बसवण्यात यश
Chandrapur भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार हे कौटुंबिक विवाह सोहळ्यानिमित्त जबलपूर येथे असतानाही त्यांनी तिथूनच राजकीय डावपेच आखत चंद्रपूरमधील काँग्रेसची निश्चित मानली जाणारी सत्ता उलथवून लावली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि अचूक रणनीतीमुळे भाजपचा महापौर बसवण्यात त्यांना निर्णायक यश मिळाले आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या या सत्तानाट्यात केवळ आकड्यांची बेरीज-वजाबाकी झाली नाही, तर पडद्यामागे शांतपणे राबवलेली रणनीती अखेर यशस्वी ठरली. बहुमतासाठी ३४ चा आकडा आवश्यक असताना, अवघे २४ नगरसेवक हाताशी असूनही भाजपने महापौरपद पटकावले. या संपूर्ण सत्तासमीकरणाचा ‘रिमोट कंट्रोल’ सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती होता. विशेष म्हणजे, मुनगंटीवार जबलपूर येथे कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त असतानाही चंद्रपूरच्या राजकारणातील प्रत्येक हालचालीवर त्यांचे बारकाईने लक्ष होते.
https://sattavedh.com/sudhir-mungantiwar-signals-of-action-against-kishor-jorgewar-over-violation-of-party-disciplin
निवडणुकीनंतर काँग्रेस २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता आणि मित्रपक्षांचा पाठिंबा गृहीत धरता काँग्रेसची सत्ता जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि महापौरपदासाठी विजय वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. दिल्लीपर्यंत चर्चा होऊन ‘अडीच-अडीच वर्षांचा’ फॉर्म्युला ठरवला गेला, पण मित्रपक्षांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्यात असंतोष वाढला. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महापौरपदावर ठाम राहिल्याने काँग्रेसचा प्रस्ताव फसत गेला.
दुसरीकडे भाजपमध्येही मुनगंटीवार व जोरगेवार गटातील संघर्ष निवडणुकीपासूनच उफाळला होता. ‘एबी’ फॉर्म प्रकरण आणि उमेदवारीतील वादामुळे भाजपला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना (शिंदे गट) चा एक नगरसेवक मिळून भाजपचे एकूण २४ संख्याबळ होते. २४ वरून ३४ पर्यंतचा प्रवास अशक्य मानला जात असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवली, तर गटनेतेपद किशोर जोरगेवार यांना दिले. त्यानंतर मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित करण्यात आले.
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरच्या आखाड्यात मुनगंटीवारांचा ‘मुरब्बी’ डाव!
यानंतर खरी सत्ताकलाकारी सुरू झाली. मागील २५ दिवसांपासून मुनगंटीवार यांनी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर आणि प्रशांत दानव यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला होता. राजकीय चित्र तासागणिक बदलत असताना त्यांनी सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव पुढे केला. त्यामध्ये उपमहापौरपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडे आणि स्थायी समितीचे सभापतिपद दोन वर्षांसाठी देण्याचा फॉर्म्युला मांडण्यात आला.
काँग्रेसकडूनही शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र महापौरपद सोडण्यास धानोरकर तयार नसल्याने तिथे चर्चा अडकली. मुनगंटीवार यांनी नेमका हाच कमकुवत दुवा ओळखला. ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी पुन्हा प्रस्ताव देत शिवसेनेला स्पष्ट हमी दिली. याच काळात ते जबलपूरला रवाना झाले, परंतु फोनद्वारे संवाद साधत त्यांनी चर्चेची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या माध्यमातून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करार करण्यात आला. वाहनात बसून झालेल्या या करारामुळे सत्तासमीकरणाला अंतिम वळण मिळाले.
महापौर निवडणुकीच्या काही तास आधी झालेल्या या लेखी करारामुळे भाजप-शिवसेना (उबाठा) युती निश्चित झाली आणि संख्याबळाचे पारडे एका क्षणात फिरले. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने ही जागा खेचून आणली आणि संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या. काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा आणि मित्रपक्षांतील नाराजीचा अचूक अंदाज घेत मुनगंटीवार यांनी आपली चाणक्यनीती यशस्वी केली.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
या संपूर्ण घडामोडींतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ सर्वाधिक जागा जिंकणे पुरेसे नसते; तर वेळेवर घेतलेले निर्णय, विश्वासार्ह करार आणि सातत्यपूर्ण संवाद सत्ता मिळवून देतात. चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, नेतृत्व म्हणजे केवळ उपस्थिती नव्हे, तर परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता होय. जबलपूरमध्ये असतानाही चंद्रपूर महापालिकेत सत्तेचा ‘चमत्कार’ घडवून त्यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली…








