nagpur-municipal-corporation-standing-committee-appointment-delay-bjp-congress : भाजपमधील अंतर्गत कलहामुळे विशेष सभा तडकाफडकी स्थगित; कुमुद गुडधे यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
Nagpur नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या नावांवर भाजपमध्ये एकमत होत नसल्याने, विशेष सभेत हा विषय जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा स्पष्टपणे समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे यांनी ही सभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आता या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्या पत्नी आणि नगरसेविका कुमुद गुडधे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र लिहून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. हा निर्णय नेमक्या कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला, याची अधिकृत माहिती त्यांनी पत्राद्वारे विचारली आहे. कुमुद गुडधे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप प्रशासकीय आणि राजकीय पेचात अडकल्याचे चित्र दिसत आहे.
नागपूर महापालिकेत ६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. स्पष्ट बहुमत असल्याने भाजपच्या उमेदवार नीता ठाकरे महापौरपदी, तर लीला हाथीबेड उपमहापौरपदी बहुमताने निवडून आल्या. नियमानुसार, त्यानंतर लगेचच स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते, कारण याच सदस्यांमधून पुढे समितीचा सभापती निवडला जातो. मात्र, भाजपने अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हा विषय तांत्रिक कारणास्तव टाळला असल्याचे बोलले जात आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सध्या शिवानी दाणी यांचे नाव आघाडीवर आहे. दाणी यांना मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय मानले जाते, मात्र भाजपमधील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शवल्याचे समजते. “आम्हाला संधी कधी मिळणार?” असा सवाल या ज्येष्ठ सदस्यांनी पक्षांतर्गत बैठकीत उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संजय बालपांडे यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित मानले जात होते, परंतु ऐनवेळी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेत स्थायी समिती ही अत्यंत शक्तिशाली मानली जाते, कारण अर्थसंकल्प सादर करणे आणि विकासकामांचा निधी मंजूर करण्याचे महत्त्वाचे अधिकार या समितीकडे असतात. हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि वर्चस्वाचे मानले जात असल्यानेच प्रत्येक गटाकडून या पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. आता स्थायी समितीचा हा तिढा सुटून सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








