Ajit pawar plane crash : अजित पवार विमान दुर्घटनेवरून राजकारण तापले

sunil-tatkare-reaction-on-rohit-pawar-allegations-ajit-pawar-plane-crash : रोहित पवारांचे गंभीर प्रश्न, सुनील तटकरेंची प्रत्युत्तरात्मक भूमिका

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवारांचा मूळ प्रवासाचा प्लॅन कारने जाण्याचा होता, मात्र आदल्या रात्री काही कारणे पुढे करून त्यांचा वेळ मुंबईत जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत विमानाने प्रवास करावा लागेल, असे नियोजन करण्यात आले होते का, असा सवाल त्यांनी केला. तसेच संबंधित विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले, व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिले आणि त्याचा तपास अहवाल अद्याप जाहीर का करण्यात आलेला नाही, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Bharat band : केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी संप

बारामती येथे आयएलएस प्रणाली नसल्यामुळे अपघात झाला असल्याचे सांगितले जात असले तरी या कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता, मात्र त्याचा अहवाल जाहीर झाला नाही, तो दाबण्यात आला का, असा आरोप रोहित पवार यांनी केला. संबंधित विमान कंपनीवर युरोपमध्ये बंदी घालण्यात आली असल्याचा दावा करत भारतात मात्र कारवाई का होत नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. योग्य वेळी तपास झाला असता तर आजची दुर्घटना टळली असती, असेही ते म्हणाले.

रोहित पवार यांच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती देशासमोर मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. संशय व्यक्त करायचा असेल तर त्यासाठी ठोस पुरावे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. युरोपीय कंपनीकडे तपास देण्यात आला होता का किंवा कोणाचा फोन गेला, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांबाबत माहिती देण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच रोहित पवार यांनी आपल्या नावाचा उल्लेख केला असल्यास ते स्पष्ट सांगावे, मग आपण त्यावर उत्तर देऊ, असे तटकरे म्हणाले. 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता नियोजित बैठक होती आणि ती सुमारे पावणे सातपर्यंत पार पडली होती. ही बैठक तीन दिवस आधीच ठरलेली होती, कारण त्या काळात अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर आणि आपण रायगडच्या दौऱ्यावर होतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Nagpur Municipal Corporation : स्थायी समितीच्या नियुक्त्या कोणाच्या दबावाखाली रोखल्या? काँग्रेसने वाढवले भाजपचे टेन्शन

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून दुर्घटनेच्या चौकशीबाबत केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून अधिकृत अहवाल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.