chandrapur-bjp-kishor-jorgewar-entry-controversy-groupism-crisis : चंद्रपूर भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून झालेला जोरगेवारांचा प्रवेश ठरतोय वादाचा केंद्रबिंदू !
Chandrapur : निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून झालेला किशोर जोरगेवार यांचा पक्षप्रवेश आता भाजपासाठी उघड डोकेदुखी ठरू लागला आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणारे कार्यकर्ते मनोज पोतराजे यांच्या पत्नीचे तिकीट जाणीवपूर्वक कापल्याचा आरोप होत असून, या निर्णयामुळे तळागाळात तीव्र संताप उसळला आहे. त्याचा थेट परिणाम संघटनात्मक रचनेवर होताना दिसत असून, आधीच नाराजी व्यक्त करणारे अनेक भाजपा कार्यकर्ते आता जोरगेवार यांना उघड आव्हान देऊ लागले आहेत.
चंद्रपूरसारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात अशा पद्धतीने बाहेरून आलेल्या नेतृत्वाला थेट वरचढ स्थान देणे हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानावर घाव असल्याचा आरोप केला जात आहे. विधानसभेत अनेक पक्षांसोबत चर्चा करून शेवटी भाजपमध्ये दाखल झालेल्या जोरगेवारांना थेट महत्त्वाच्या राजकीय समीकरणांच्या केंद्रस्थानी बसवण्यात आले आणि वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणाऱ्यांना दुय्यम स्थान देण्यात आले, हीच चूक आता भाजपला महागात पडत असल्याची चर्चा आहे.
Chandrapur Municipal Corporation : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आरोप अन् संजय राऊतांनी हात झटकले
महानगरपालिकेतील सत्तानाट्यानंतर श्रेयवादाची ठिणगी उडाली. संख्याबळाच्या गुंतागुंतीतून सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखणारे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याचे पक्षातील अनेक पदाधिकारी सांगत असताना, विजयाचे संपूर्ण श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न जोरगेवारांनी केल्याचा थेट आरोप होत आहे. “सत्ता माझ्यामुळे आली” या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत संतुलन ढासळल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे कार्यकर्ते मनोज पोतराजे यांनीही आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना खुले आव्हान दिले आहे. आपल्या पत्नीचे अधिकृत तिकीट अचानक कापताना स्वतःवर पक्ष विरोधात प्रचार केल्याचा खोटा ठपका ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, असे कोणतेही वक्तव्य किंवा कृत्य आपण केले नसल्याचे स्पष्ट करत, जोरगेवारांनीच पूर्वी ‘यंग चंदा ब्रिगेड’च्या माध्यमातून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केल्याचे पुरावे आपल्या कडे असल्याचा दावा पोतराजे यांनी केला असून, चौकात येऊन सत्य सिद्ध करण्याचे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
१७ एबी फॉर्म प्रकरण हे निष्ठावंतांना बाजूला सारण्यासाठी केलेला आटापिटा आणि त्यानंतर त्यांच्या गटातील सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर झालेली प्रदेश भाजपाकडून कार्यवाही त्यामुळे भाजपात मोठा कार्यकर्त्यांचा गट नाराज झाला असून, ही घटना भविष्यातील अपयशाचे मुख्य कारण ठरू शकते, अशी चर्चा आहे. परिणामी पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंद्रपूर भाजपमध्ये सध्या उघड गटयुद्ध सुरू असल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही. प्रत्येक कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन, स्वतःचा वेगळा गट उभा करण्याचे प्रयत्न या सर्व हालचालींमुळे पक्षात काँग्रेससदृश संस्कृती शिरल्याची टीका होत आहे. भाजपची शिस्त, विचारधारा आणि संघटनात्मक बांधिलकी यांना दुय्यम स्थान देत व्यक्तीकेंद्री राजकारण पुढे आणले जात असल्याचा आरोप कार्यकर्ते उघडपणे करत आहेत.
Buldhana Politics : बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी गळती; मित्रपक्ष आणि विरोधकांनीच फोडली खिंडार!
तळागाळातील असंतोष आता केवळ नाराजीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो संघटनात्मक नुकसान आणि निवडणूक परिणामांवर थेट परिणाम करू शकणाऱ्या टप्प्यावर पोहोचल्याची भीती व्यक्त होत आहे. निष्ठावंतांना डावलून उभारलेले नेतृत्व पक्षासाठी किती घातक ठरू शकते, याचा अनुभव चंद्रपूर भाजप सध्या घेत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.








