devendra-fadnavis-delhi-visit-bjp-national-president-maharashtra-politics-update : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर चर्चा
Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीचा दौरा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री राजधानीत दाखल झाल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. दरम्यान, या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी तिच्या राजकीय अर्थांवर चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. अधिकृत कार्यक्रमाच्या निमित्ताने राजधानीत आलेल्या फडणवीस यांनी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडमध्ये असताना नितीन नबीनयांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यामुळे त्या वेळी फडणवीस उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतरच्या दिल्ली भेटीत अमित शाह यांच्याशी चर्चा झाली; मात्र त्या वेळी नितीन नवीन बिहार दौऱ्यावर असल्याने दोघांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे या वेळी झालेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Chandrapur BJP : जोरगेवारांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रपूर भाजपात गटबाजीचा भडका
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे अधिक बारकाईने पाहिले जात आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. असे घडल्यास राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीतील हालचाल आणि राष्ट्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत महत्त्वाची मानली जात आहे.
Chandrapur Municipal Corporation : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आरोप अन् संजय राऊतांनी हात झटकले
अधिकृतरीत्या ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र बैठकीचा नेमका अजेंडा किंवा चर्चेचा तपशील अद्याप सार्वजनिक झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने वळण घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








