Adv. Ajay Waghmare elected President of Akola Bar Association : वारसाहक्क नव्हे, लोकसंबंध ठरले निर्णायक; ४९ मतांनी हेमसिंह मोहता पराभूत
Akola अकोला बार असोसिएशनच्या २०२६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. एकूण १,३३२ मतदारांपैकी मोठ्या संख्येने मतदान झाले. काही मते अवैध ठरली असली तरी वैध मतांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. यू. नाईक यांनी शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी अधिकृत निकाल घोषित केला.
अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत अॅड. अजय तुळशीदास वाघमारे यांनी ६८२ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अॅड. हेमसिंह मोतीसिंह मोहता यांना ६३३ मते मिळाली. अवघ्या ४९ मतांच्या फरकाने झालेला हा पराभव विधिज्ञ वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. अॅड. संजय अशोक देशमुख यांना अत्यल्प मते मिळाली.
या निकालाला सामाजिक-राजकीय संदर्भही लाभला आहे. अकोल्यातील बीजीई सोसायटीच्या निवडणुकीत अॅड. मोतीसिंह मोहता अध्यक्षपदी विजयी झाले असले, तरी अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव अॅड. हेमसिंह मोहता यांचा पराभव झाला. त्यामुळे नाव, ओळख किंवा वारसाहक्कापेक्षा लोकसंबंध महत्त्वाचे ठरतात, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे. अॅड. अजय वाघमारे यांचा विजय हा पूर्णतः लोकसंपर्क व विश्वासावर आधारित असल्याची चर्चा आहे.
महिला उपाध्यक्षपदासाठी झालेल्या पंचकोनी लढतीत अॅड. शीतल देवानंद गवई यांनी ५५२ मते मिळवत बाजी मारली. अॅड. शारदा मल्होत्रा (३७८), अॅड. निर्मला नागदेवे, अॅड. मंजू सावरकर (१६३) आणि अॅड. संगीता गावंडे (७६) यांना अनुक्रमे मते मिळाली.
Vidarbha Farmers : कर्जमाफीची तयारी; ‘डेटा’ संकलनाला उद्याची डेडलाइन
उपाध्यक्षपदासाठी अॅड. विजय प्रभाकरराव भांबेरे यांनी ६७५ मते मिळवून विजय संपादन केला. अॅड. सुमेध डोंगरदिवे (२६४) व अॅड. राहुल वानखेडे (३७५) यांचा पराभव झाला. संयुक्त सचिवपदी अॅड. प्रमोद देवीदास कोरडे यांनी ७०० मते मिळवत विजय मिळविला. अॅड. आकाश भगत (४९७) व अॅड. पवनेश अग्रवाल (१२१) यांना मते मिळाली.
नव्या पदाधिकाऱ्यांकडून वकिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका, न्यायालयीन कामकाजात सुसूत्रता आणि बार-बेंच समन्वय वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या निकालामुळे अकोल्यातील विधिज्ञ वर्तुळात राजकीय व सामाजिक पातळीवरही जोरदार चर्चा सुरू आहे.








