mantralaya-bribery-case-rajendra-dheringe-acb-raid-narhari-zirwal-moves : राजेंद्र ढेरिंगेच्या घरी धाड, नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
Mumbai: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात उघडकीस आलेल्या लाचप्रकरणात तपास यंत्रणांनी हालचालींना वेग दिला असून आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. मंत्रालयातील कार्यालयात लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आधीच खळबळ उडाली असताना, आता तपासाचा फास आणखी आवळला जात आहे.
लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या राजेंद्र ढेरिंगे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी एसीबीने नाशिक रोड येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ही कागदपत्रे न्यायालयात सादर केली जाण्याची शक्यता असून, तपासात नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nagpur Crime: खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला
राजेंद्र ढेरिंगे हे मूळतः अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून वर्षभरापूर्वी त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ते मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी ढेरिंगे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ विभागात परत पाठवण्याची विनंती केल्याची माहिती आहे.
या घडामोडींमुळे झिरवळ यांच्यावर विरोधकांकडून दबाव वाढत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत असताना, गेल्या दोन दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्याची चर्चा आहे. त्यांचा मोबाईल फोन सध्या बंद असल्याचेही सांगितले जात आहे. आज ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत झिरवळ प्रकरणावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Prashant Dikkar : प्रशांत डिक्करांचा ‘तेल्हाऱ्या’कडे मोर्चा; बुलढाणा सोडून अकोल्यात नशीब अजमावणार?
याशिवाय झिरवळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही समजते. या सर्व हालचालींमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. दरम्यान, झिरवळ यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना, “माझ्या विभागातील क्लार्क लाचप्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहे. त्याने केलेल्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असे स्पष्ट विधान केले होते. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
__








