Vidarbha Sahitya Sangha : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘घमासान’; माजी उपाध्यक्षांनाच नाकारले सभागृह!

election-controversy-shripad-joshi-hall-denied : आचारसंहितेचा हवाला देत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशींची कोंडी

Nagpur विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच विदर्भातील साहित्यिकांच्या वर्तुळात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक दिग्गज साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. कालपर्यंत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणारे साहित्यिक आता विविध पॅनेलमध्ये विभागले गेले आहेत. ही निवडणूक साहित्यिक मूल्यांना धरून खेळीमेळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना, आता राजकीय निवडणुकांप्रमाणेच आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांची कोंडी करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

या वादाचे पडसाद विदर्भ साहित्य संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात उमटले असून, संघाचे सदस्य आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी रीतसर भाडे भरूनही संस्थेचे माजी उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना सभागृह उपलब्ध करून देण्यास नकार देण्यात आला आहे. या प्रकारामुळे साहित्य वर्तुळातून आश्चर्य, नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Disha Committee : वन विभागाच्या तांत्रिक पेचामुळे मेळघाटातील विकासकामे ठप्प; ‘दिशा’ बैठकीत यंत्रणांनी मांडला तक्रारींचा पाढा

मराठी भाषेच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे, अभिजात मराठी चळवळीचे प्रमुख संयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष असलेल्या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा ‘संवाद सेतू’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ‘अभिनय’ या संस्थेने रीतसर भाडेही भरले होते; मात्र ऐनवेळी त्यांना सभागृह नाकारण्यात आले.

ज्या व्यक्तीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला, अशा ज्येष्ठ साहित्यिकाच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यापर्यंत संस्थेची अधोगती झाली आहे का? ही संस्था साहित्यिकांची आहे की असाहित्यिकांची, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या वादावर विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान सरचिटणीस विलास मानेकर यांनी स्पष्टीकरण दिले असून, निवडणूक जाहीर झाली असल्याने आचारसंहितेचा भाग म्हणून कोणालाही साहित्य संघाच्या आवारात प्रचारासाठी जागा उपलब्ध करून देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

Zhilla parishad election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे मोर्चेबांधणी; शिंदेसेनेच्या नव्या चेहऱ्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार?

साहित्य संघाने जागा नाकारल्याने आता हा ‘संवाद सेतू’ कार्यक्रम महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शंकरनगर येथील भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. शरद निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सर्व घडामोडींमुळे विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकरणाचे पडसाद मतदानावर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.