opposition-boycott-government-tea-meeting-allegations-on-ajit-pawar-plane-crash-and-farmer-issues : अजित पवार यांच्या विमान अपघातापासून शेतकरी प्रश्नांपर्यंत गंभीर आरोपांची सरबत्ती!
Mumbai: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत असून सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा करताना ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर विविध गंभीर आरोप केले.
पत्रकार परिषदेत सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने चर्चा रंगली. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी सर्व पक्ष एकत्र असल्याचे सांगितले आणि संवादातील विलंबामुळे काही नेते उशिरा येत असल्याचे स्पष्ट केले.
विरोधकांनी सरकारवर बहुमताच्या जोरावर दडपशाही केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसताना सरकार निष्क्रिय असल्याची टीका करण्यात आली. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सरकारने सविस्तर स्पष्टीकरण दिले नसल्याचा आरोप करत या घटनेबाबत पारदर्शक चौकशीची मागणी करण्यात आली. हा अपघात की घातपात, याबाबत स्पष्टता का दिली जात नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्विंटलने वाढवा !
‘लाडक्या बहिणी’ योजनेवरूनही सरकारला लक्ष्य करण्यात आले. या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी झाल्याचा दावा करत विरोधकांनी महिलांना लाभापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना एक रुपयांचा पीक विमा देखील मिळाला नसल्याचे सांगत सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याची टीका करण्यात आली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण, बेरोजगारी आणि गुंतवणुकीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परदेशात मोठ्या गुंतवणुकीचे करार केल्याचा दावा करणाऱ्या सरकारने त्याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Maharashtra budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक
भारत-अमेरिका व्यापार कराराचा राज्यातील शेतकऱ्यांवर परिणाम होणार असल्याचा इशाराही देण्यात आला. कापूस, सोयाबीन, मका, तूरडाळ आदी पिकांना हमीभाव मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. कापूस खरेदीत मोठी घट झाल्याचे सांगत शेतकऱ्यांचा माल घरात पडून असल्याची स्थिती मांडण्यात आली. यवतमाळ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करत सरकारकडे शेतकऱ्यांबाबत कोणतीही कणव नसल्याचा आरोप करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि योजनांतील विसंगतीचे आरोप करत विरोधकांनी अधिवेशनात हे सर्व मुद्दे आक्रमकपणे मांडण्याचा इशारा दिला आहे.
एकूणच, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. चहापानावर बहिष्कार टाकत संघर्षाची सुरुवात केल्याने येत्या अधिवेशनात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








