Night landing at amravati airport from April : धावपट्टी विस्तारासाठी नवी निविदा; अमरावती विमानतळ अद्ययावत होण्याकडे वाटचाल
Amravati गेल्या काही महिन्यांपासून एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून अमरावती विमानतळावर नाइट लँडिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली असून, एप्रिल २०२६ पासून नाइट लँडिंगची सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमरावती विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याच्या दृष्टीनेही हालचालींना वेग आला आहे. सध्या विमानतळावरून एटीआर-७२ प्रकारच्या प्रवासी विमानांची नियमित ये-जा सुरू असून, प्रवासी प्रतिसाद समाधानकारक असल्याने रनवे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Budget session : अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
धावपट्टी विस्तारासाठी कन्सल्टन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, यामध्ये धावपट्टीचे सर्वेक्षण, जमीन अधिग्रहण आदी बाबींचा समावेश असेल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे २७ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे प्री-बीड बैठक आयोजित करण्यात आली होती. १० फेब्रुवारी रोजी निविदांचे बीड उघडण्यात आले असून, अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत नाइट लँडिंग सुविधा आणि धावपट्टी विस्तार या दोन महत्त्वाच्या बाबी प्रत्यक्षात येण्याची शक्यता असून, त्यामुळे अमरावती विमानतळाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.
एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून अमरावती विमानतळावर नाइट लँडिंगसाठी आवश्यक संयंत्रे बसविण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून चाचणी झाल्यानंतर या संयंत्रांना अधिकृत मान्यता दिली जाईल, असे अमरावती विमानतळाचे प्रबंधक गौरव उपशाम यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट ३ लाख क्विंटलने वाढवा !
मार्चअखेरपर्यंत नाइट लँडिंगची सर्व कामे पूर्ण करण्याची डेडलाइन आहे. डीजीसीएकडून एकदा चाचणी पूर्ण झाली की रात्रीसुद्धा विमानांची ये-जा सुरू होईल. अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच धावपट्टी विस्ताराची प्रक्रिया भविष्यासाठी आशादायी आहे, असे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख म्हणाले.
अमरावती विमानतळ अद्ययावत होत असल्याने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्काच्या दृष्टीने विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उडान योजनाअंतर्गत अमरावती विमानतळ केवळ पायाभूत सुविधा म्हणून नव्हे, तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवाशांसाठी सुवर्णद्वार ठरण्याची अपेक्षा आहे.








