20-renaming-proposals-will-be-introduced-in-BMC-meeting : बप्पी लहरी ते अटल बिहारी वाजपेयी; मुंबईतील रस्ते आणि पुलांना मिळणार दिग्गजांची नावे
Mumbai : तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई महानगरपालिकेची (BMC) पहिली सर्वसाधारण सभा २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. नवनियुक्त महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या पहिल्याच सभेत एकूण २७ प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यातील तब्बल २० प्रस्ताव हे मुंबईतील रस्ते, पूल आणि चौकांच्या नामांतराशी संबंधित आहेत.
चार वर्षांनंतर झालेल्या निवडणुकांनंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता महापालिकेत असून, या नामांतराच्या प्रस्तावांवरून सभेत जोरदार राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सादर केलेल्या एकूण २७ प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीचे आहेत, तर एक प्रस्ताव पदपथावर काम करणाऱ्या मजुरांना स्टॉल देण्याबाबतचा आहे. उर्वरित २० प्रस्तावांमध्ये मुंबईच्या विविध भागांतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या नामकरणाचा समावेश आहे.
Ajit Pawar death : अजित पवारांची हत्या राजीव गांधींप्रमाणेच? अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
यात मालाड पश्चिम येथील जलतरण तलावाचे नाव ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव’, तर वरळी येथील जलतरण तलावाचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देण्याचे प्रस्तावित आहे.
इतर महत्त्वाच्या प्रस्तावांमध्ये काळा घोडा परिसरातील चौकाला ‘सायमन पेरेस चौक’, गोरेगावमधील बांगूर नगर येथील रस्त्याला ‘भूदरमलजी धनुका रोड’ आणि लालबाग येथील बॉम्बे गॅस लेन मैदानाचे नाव ‘योगेश पाटील मनोरंजन मैदान’ असे करण्याचे नियोजन आहे. अंधेरी पश्चिम येथे ‘ॐ शिव शंकर मंदिर मार्ग’ आणि प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘संगीतकार बप्पी लहरी मार्ग’ अशी नामांतरे सुचवण्यात आली आहेत.
याशिवाय मुलुंड कॉलनीतील चौकाला ‘श्री झूलेलाल भगवान चौक’ असे नाव देण्यासह चेंबूर, पवई आणि मुलुंडमधील इतर काही रस्ते व चौकांच्या नामांतराचा विचार होणार आहे. पहिल्याच सभेत इतक्या मोठ्या प्रमाणात नामांतराचे विषय आल्याने राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही गट याला मुंबईचा ऐतिहासिक वारसा आणि महापुरुषांचा सन्मान मानत आहेत.
Lakhni APMC : संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा ‘काटा‘ काढला; लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ
तर विरोधक याला मूळ विकासकामांवरून लक्ष भरकटवण्याचे राजकारण म्हणत टीका करण्याची चिन्हे आहेत. २५ फेब्रुवारीच्या सभेत कोणत्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होते आणि कोणते प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात अडकतात, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.








