Vanjari-community-adopts-a-counter-offensive-stance-at-the-OBC-Elgar-rally : ओबीसी एल्गार मेळाव्यात वंजारी समाजाचा प्रतिआक्रमक पवित्रा
Lonar लोणार तालुक्यातील चिखला येथे महापुरुषाच्या पुतळ्यावरून झालेल्या कथित वादाला जातीय रंग देत वंजारी समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा जोरदार आरोप बीबी येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात करण्यात आला. “पुतळ्याचा वादच नव्हता आणि महिलांचे कपडे फाडण्याची घटना घडलेली नाही,” असा ठाम दावा करत वंजारी समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाकडून होत असलेल्या आरोपांना राजकीय हेतूचा ठपका ठेवला.
२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या मेळाव्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, सुभाष दराडे, वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या सविता मुंडे तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ उपस्थित होते.
Bjp core committee : राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजप कोअर कमिटीची निर्णायक बैठक
चिखला काकड येथे पुतळा हटविण्याच्या मुद्द्यावरून संजीवनी वाघ यांना मारहाण करून कपडे फाडल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपांना फेटाळून लावत वक्त्यांनी दावा केला की, महिलांमध्ये केवळ झटापट झाली; कोणत्याही पुरुषाने हात लावलेला नाही. “जर कोणी कपडे फाडले असतील तर त्याचे व्हिडिओ पुरावे द्या, डीव्हीआर तपासा,” अशी उघड मागणी करण्यात आली.
नेत्यांनी असा आरोप केला की, राजकीय हेतूने हे प्रकरण वाढवून वंजारी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. “महापुरुषांच्या आडून जातीचे राजकारण करू नका,” असा इशाराही देण्यात आला.
एकतर्फी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत पोलिस प्रशासनालाही जाब विचारण्यात आला. “निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा, आवश्यक असल्यास नार्को टेस्ट घ्या,” अशी मागणी करण्यात आली. बाहेरून येऊन वातावरण बिघडविणाऱ्यांवर कलम ३७ अंतर्गत कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
Bjp maharashtra : भाजपची महाराष्ट्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान काही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. “परीक्षा बुडाल्या तर जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित करत तत्काळ चौकशीची मागणी झाली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ फेब्रुवारीला सभा घेण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर वंजारी समाजानेही आक्रमक भूमिका घेतली. “जरांगेंनी सभा घेतली तर त्याच्यासमोर आम्ही लाखोंची सभा घेऊ,” असा इशारा देत सामाजिक वातावरण बिघडवू नये, असे आवाहन करण्यात आले.
वक्त्यांनी स्पष्ट केले की, दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रासाठी घातक ठरेल. “माणसं एकमेकांपासून तुटू नयेत; पण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” असा ठाम संदेश देण्यात आला.
मेळाव्यातील सर्वच वक्त्यांनी डीव्हीआर तपासणी, स्वतंत्र चौकशी आणि सत्य बाहेर आणण्याची मागणी केली. “ही शेवटची सभा नाही; पुढेही सत्य मांडू,” असा इशाराही देण्यात आला.
बीबीतील हा ओबीसी एल्गार मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरला असून चिखला प्रकरण आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








