neelam-gorhe-big-statement-house-adjourned-nashik-vishva-marathi-sammelan : नीलम गोऱ्हे यांचा नाशिकमध्ये गौप्यस्फोट
Nashik : कधी कधी ठरवून सभागृह तहकूब केले जाते, असा खळबळजनक दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. नाशिक येथे आयोजित विश्व मराठी संमेलनात बोलताना त्यांनी विधानभवनातील गदारोळ आणि कामकाज तहकूब होण्यामागील पडद्याआडचे वास्तव उघड केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत समन्वयाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमधील विश्व मराठी संमेलनातील परिसंवादात विधानभवनात होणारा गोंधळ हा कोणत्या व्याकरणाचा अलंकार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा विरोधक विशिष्ट मुद्द्यावर सभागृहात गोंधळ घालतात, कारण त्यांना त्या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते. मात्र नियमानुसार एखाद्या मंत्र्यावर आरोप करायचा असेल किंवा एखादा गंभीर मुद्दा उपस्थित करायचा असेल तर त्यासाठी आधी नोटीस देणे आवश्यक असते.
Asia economic dialogue : मोफत योजनांना पाच वर्षे ब्रेक द्या, उद्योगांना करमाफी द्या!
उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयात पैसे सापडल्याची घटना घडली तर विरोधकांना तत्काळ चर्चा हवी असते. पण नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ती चर्चा लगेच घेता येत नाही. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद पडल्यासारख्या घटनेवर प्रश्न उपस्थित करायचा असल्यास तारांकित प्रश्नासाठीची मुदत आधीच संपलेली असू शकते. अशा वेळी विरोधक आपला राजकीय धर्म पाळत आक्रमक भूमिका घेतात.
Dispute over post : श्रीरामांविषयी प्रक्षोभक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
गोऱ्हे यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षही बुद्धिबळाच्या पटावरील व्यूह रचनेसारखी रणनीती आखत असतो. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेत ठाम असतात आणि काही वेळा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सभागृह तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. “कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो,” असे स्पष्ट विधान त्यांनी केले.
या वक्तव्यामुळे विधानभवनातील गोंधळ हा केवळ आकस्मिक नसून काहीवेळा राजकीय रणनीतीचा भाग असतो का, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पडद्याआड समन्वय असतो का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गोऱ्हे यांच्या या विधानावरून पुढील काही दिवसांत राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








